लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : गेल्या दीड वर्षापासून नवीन पनवेलमध्ये पालक विरुद्ध सेंट जोसेफ व्यवस्थापन असा संघर्ष सुरू आहे. शुल्कवाढीचा निर्णय नियंत्रण समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. आहे. मंगळवारी महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे शाळेत गेले आणि व्यवस्थापनाला तंबी दिली. ही शाळा महापालिका क्षेत्रात आहे त्यामुळे पालकांना वेठीस धरू नका, अन्यथा माझ्या अधिकारक्षेत्राखाली कारवाई करावी लागेल, असा इशारा दिल्याने शाळा व्यवस्थापन नरमले.सेंट जोसेफ हायस्कूलविरोधात गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून पालकांचे आंदोलन सुरू आहे. शाळेने बेकायदेशीर शुल्कवाढ केल्यामुळे त्याला अनेक पालकांचा ठाम विरोध आहे. याविरोधात तीव्र लढा पुकारण्यात आला आहे. असे असताना शाळा व्यवस्थापनाने आंदोलन करणाऱ्या पालकांच्या पाल्याच्या प्रगतीपुस्तकावर प्रॉब्लेमॅटिक पेरेंट्स, फीस नॉट पेड असा शेरा मारला होता. त्याचबरोबर अनेकांना प्रवेश सुध्दा नाकारलेला आहे. आंदोलनकर्त्यांचे पाल्य आमच्या शाळेत नकोत असे जाहीरपणे शाळेकडून सांगण्यात येत आहे. याबाबत नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पालकांना बरोबर घेवून आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या कानावर हा प्रकार घातला. याबाबत मंगळवारी आयुक्तांनी शाळेला भेट दिली असता मुख्याध्यापिका सुटीवर असल्याचे संबंधितांनी सांगितले. त्यांचा रजेचा अर्ज दाखवा तेव्हा मुख्याध्यापिकेने मेल केला असल्याचे सांगण्यात आले. मेल तरी दाखवा अशी विचारणा आयुक्तांनी केल्यानंतर सर्वांची भांबेरी उडाली. दोन दिवसांत सर्व तक्रारींचे निवारण करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा आयुक्त शिंदे यांनी शाळेला दिला. या वेळी संतोष शेट्टी, डॉ. कविता चौतमोल, राजश्री वावेकर यांच्यासह पालक उपस्थित होते.कारवाईचे संकेतसेंट जोसेफ हायस्कूल पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. शालेय शिक्षण नियमानुसार त्या शाळेवर कारवाई करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असतात. ते एका क्षणात मान्यता रद्द करण्याबरोबरच शाळा बंद करू शकतात. त्याच अधिकाराची माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी सेंट जोसेफ व्यवस्थापनाला दिली. मुख्याध्यापकांनी भेट देण्यास टाळाटाळ केल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.
सेंट जोसेफच्या व्यवस्थापनाला तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 2:53 AM