लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : इंडोनेशिया येथून आलेली एक कोटी रुपये किमतीची कॉपर वायर निश्चित ठिकाणी पोचण्यापूर्वीच चोरी करणाऱ्या टोळीच्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कंटेनर व ८० लाख रुपये किमतीची चोरीची कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात इतर तिघांचा समावेश असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गुजरातमधील पॉलीकॅब वायर्स या कंपनीने इंडोनेशिया येथून कॉपर अॅनालेड वायर मागवली होती. सुमारे एक कोटी रुपये किमतीच्या मालाचा हा कंटेनर जेएनपीटी येथे आला होता. तिथून तो बक्शा बॉम्बे कॅरीअर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत २४ मे रोजी गुजरातला पाठवला जात होता. त्यापूर्वीच उरणमधील चिर्ले येथून हा कंटेनर चोरीला गेला होता. याची तक्रार दाखल झाल्यानंतर उरण पोलीस व गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने तपासाला सुरवात केली होती. कंपनीने अनिल कुंटे यांना देखील कंटेनरसोबत ठेवले होते. परंतु जेएनपीटीमधून कंटेनर बाहेर निघाल्यानंतर चालक ओमप्रकाश राजभर याने दोघा अनोळखी व्यक्तींना कंटेनरमध्ये घेतले. यामुळे कुंटे यांनी संशयाने त्यांच्याकडे चौकशीला सुरवात केल्याने काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कंटेनर पळवून नेला होता.घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चोरीचा कंटेनर अहमदनगर येथील कोपरगावमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला मिळाली. यानुसार उपआयुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर यांनी सहायक निरीक्षक किरण भोसले, बबन जगताप, सुभाष पुजारी, हवालदार अनिल पाटील, जगदीश पाटील आदींचे पथक त्याठिकाणी रवाना केले होते. त्याठिकाणी चोरीच्या कंटेनरसह रंजितसिंग बलदेवसिंग आनंद (३६) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कंटेनरचालक राजभर व त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी दिली.>सासरा पोलीस, जावई चोरओमप्रकाश राजभर हा सराईत गुन्हेगार असून, तो एका पोलीस अधिकाऱ्याचा जावई असल्याची माहिती पुढे आली आहे. सोयीनुसार कंटेनरवर चालकाचे काम करताना तो त्यामधील मालाची माहिती मिळवायचा. संपर्कात असलेल्या एखाद्याला त्या मालाची आवश्यकता असल्यास संधी साधून कंटेनर चोरून न्यायचा. त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
कॉपर वायर चोरणारा अटकेत
By admin | Published: June 07, 2017 2:54 AM