अहमदनगर : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्यावतीने न्यायालयात सादर जामीन अर्जाला सोमवारी सरकारी पक्षाने विरोध केला. आरोपीस जामीन दिला तर साक्षीदार फोडण्याची शक्यता असल्याचा लेखी युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर सादर केला़ मंगळवारी न्यायालयात त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे़ जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सोमवारी कोपर्डी खटल्याची पुन्हा सुनावणी सुरू झाली़ दोषारोप ठेवलेले जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना हजर करण्यात आले होते़भैलुमे याचा दोषमुक्त करण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे़ या अर्जाबाबत उच्च न्यायालयातील प्रगती अहवाल सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले़ आरोपीचे वकील बुधवारी त्याची माहिती देणार आहेत़ त्यानंतर भैलुमेच्या अर्जावर सुनावणी होईल. कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला गुन्हा करण्यासाठी भैलुमे याने मदत केली होती़ गुन्हा घडण्याच्या काळी वेळ आधी भैलुमे हा कोपर्डी येथील घटनास्थळाजवळील रस्त्यावरून दुचाकीवरून पेट्रोलिंग करत होता़त्यानंतरच पीडितेवर अत्याचार करून तिचा खून झाला़ भैलुमेला जामीन दिला तर साक्षीदार फोडण्याची शक्यता आहे, असा लेखी युक्तिवाद निकम यांनी न्यायालयासमोर सादर केला़ पोलिसांनी भैलुमेचे राहते घर सील केले असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते़ त्याबाबत सरकारी पक्षातर्फे भैलुमेचे घर सील केले नसल्याचे निकम यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)