सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आर्र्थिक कारभाराविषयी हिंदू जनजागृती समितीने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत मिळावी, अशी मागणी अंनिस’च्या विश्वस्तांनी बुधवारी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे केली. ‘अंनिस’च्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट आणि राष्ट्रीय वारकरी सेनेचे बापूमहाराज रावकर यांनी केला होता. या तक्रारीची सुनावणी बुधवारी येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त डॉ. शैला दाभोलकर, अविनाश पाटील आणि प्रतापराव पवार यांच्यावतीने त्यांचे वकील सुकटे कार्यालयात उपस्थित राहिले. हिंदू जनजागृती समितीच्या तक्रारीची प्रत मिळावी, जेणेकरून आम्हाला आमचे म्हणणे मांडता येईल, असेसुकटे यांनी यावेळी सांगितले. तक्रारदार घनवट आणि रावकर यांनी ‘अंनिसच्या घोटाळासंदर्भात सातारा येथील धर्मादाय निरीक्षकांनी जो अहवाल सादर केला आहे तो मिळावा, अशी मागणी केली. घनवट यांच्यावतीने हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ४ मार्च रोजी होईल, तसेच संबंधित कागदपत्रेही दिली जातील, असे सहायक धर्मादाय आयुक्तांनी सांगितले.
‘अंनिस’ विरोधातील तक्रारीची प्रत द्या
By admin | Published: February 09, 2017 5:10 AM