मुंबई - कोरोनानं भाकरी हिरावून घेतली काम थांबली. कोरोनात अशी वेळ आली की माझी लेकरं पाणी पिऊन झोपली. भाकरीची भूक पाण्यावर का भागत नाही असं प्रश्न लेकरं विचारत होती. त्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही. मात्र अनेकांनी या काळात थोडी फार होईना मदत केली असं सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बोधमार्ग फाऊंडेशनच्या ऑनलाईन ‘बोधवारी’(Bodhwari) या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता.
यावेळी सिंधुताई सपकाळ(Sindhutai Sakpal) म्हणाल्या की, कोरोनानं फार दु:खं दिलं. त्यावर फुंकर घाला, बोध घेता घेता जगणं शिका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही. कोरोना काळात तग धरा, ढासळू नका.वारीच्या निमित्ताने माणसांना कुठेतरी समाधान, आत्मिक सुख, मानसिक शांती मिळते. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. सोबत चला. कोरोनानं ह्दय तोडली त्याला गाठ आपण मारू, कुणीही कुणाचं नसतं. कोरोनानं आत्मीयता कशी असते? जिव्हाळा कसा असतो? भूक काय असते? देण्याघेण्याची प्रवृत्ती कशी असते? हे शिकवलं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत सव्वा वर्ष झालं मी घरात बसून आहे. दिवस विवंचनेत जायचा तर रात्रं टेन्शनमध्ये जात होती. लेकरं अपेक्षेने पाहत असतात. हे दिवसही निघून जातील. कोरोना कधीतरी संपणारच आहे. उद्याचा दिवस उगवणार आहे. फक्त वाट पाहणं आपल्या हातात आहे. सर्वांनी सर्वांची काळजी घ्या, एक घास वाटून खाऊ. मागे वळून पहा, किती अंतर आपण चालत आलोय. आपलं आयुष्य वाटून टाकण्यात धन्य मानतो. आमची संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओरबाडून घेण्याची नाही. घेतलेला वसा टाकू नका. कोलमडू नका पुन्हा नव्याने उभं राहू असा विश्वास सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘बोधवारी’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचता येत आहे. सध्या लोक देवाला मानत नाही. देवा सगळ्याचं भलं कर पण सुरूवात माझ्यापासून कर अशी लोकांची भावना झाली आहे. वारी करणारी माणसं खूप मोठी नसतात ती सर्वसामान्य गरीब असतात. ते वारी करत करत देवाचं नाव घेत चालत असतात. संपूर्ण देशात ही वारी पोहचवली जात आहे हे खूप मोठं काम आहे. ‘बोधवारी’च्या माध्यमातून घराघरात पोहचता येते. विभूश्रीचं हे काम यापुढेही असेच राहो असं सिंधुताईंनी सांगितले.