श्रीकिशन काळे -पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ठिकठिकाणी वृक्षलागवड करण्याचे काम हाती घेण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे वृक्षलागवडीवर देखील संक्रांत आली आहे. वन विभागाकडून यंदा कोणतेही नियोजन केलेले नाही, तसेच सरकारकडून काहीही नियमावली आलेली नाही. त्यामुळे कोरोनामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीला ब्रेक लागला आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला सर्वत्र वृक्षलागवडीचे कार्यक्रम सुरू होतात. सरकारकडून विभागांना उद्दिष्ट दिले जाते. पण यंदा कोणतेही उद्दिष्ट दिले नाही आणि त्याबाबत अजून हालचाल देखील झाली नाही. नागरिक स्वत:च पुढाकार घेऊन वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.पुणे शहरातील वन विभागाच्या टेकड्यांवर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होते. पण यंदा वरिष्ठ पातळीवरून काहीच सूचना किंवा नियमावली आलेली नाही. दरवर्षी पाऊस आला की, नागरिक वृक्षारोपणासाठी आमच्याकडे विचारणा करतात. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोपं विक्रीसाठी देखील ठेवतो. पण अजून काहीही नियोजन नाही. वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेताना गर्दी होते. सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम होत असतील तर चांगले आहे, अशी माहिती पुणे वन क्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी दिली.=================गेल्या चार वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले होते. पण यंदा कोरोनामुळे नियोजन झालेले नाही. पण आम्ही आमच्या विभागाकडून तयारी करीत आहोत. तसेच ज्या ग्रामपंचायतींची इच्छा असेल, त्यांना रोपं उपलब्ध करून देऊ. ज्यांनी वृक्षलागवड करतील, त्यांच्याकडून जीपीएस छायाचित्र घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. सर्वत्र एकच नियम लागू नाही. वृक्षलागवडीची नियमावली आल्यानंतरच ते शक्य आहे.- रघुनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण===================दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नागरिक आमच्याकडे रोपं घेऊन जातात. सध्या कोरोनामुळे लोकांमध्ये सामाजिक सुरक्षेबाबत जागृती झाली आहे. त्यानूसार वृक्षलागवड करण्यात येत आहे. राज्यातून रोपांसाठी मागणी आहे. टेकड्यांवर फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवून वृक्षलागवड होऊ शकते.- रघुनाथ ढोले, ट्री मॅन आणि नर्सरी विक्रेते=================
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट२०१६ - २ कोटी२०१७- ४ कोटी२०१८- १३ कोटी२०१९ - ३३ कोटी२०२० - ००