कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारले आहे. त्यातील शंभर बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे.
प्रत्येक रूग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टिमर, नॅपकिन, पाणी बाॅटली, साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जात आहे. २४ तास पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वापरण्यासाठी गरम पाणी. सकस जेवण. दूध, अंडी, सूप आदींचा समावेश यामध्ये आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढे दिले जात आहे. निलेश लंके यांनी केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वसमावेशक मदत घेऊन, वर्गणी आणि देणगीतून हे कोविड सेंटर उभारलं आहे. तसेच निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत आहे.
आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे. इतकेच नाही तर काही परदेशी नागरिकांनी देखील निलेश लंके प्रतिष्ठानच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. केवळ परदेशातून १ कोटी २० लाख रुपयांची आर्थिक मदत निलेश लंके यांना मिळाली आहे.
पारनेर तालुक्याचे भूषण आदर्श गाव हिवरे बाजार मा.सरपंच पद्मश्री पोपटराव जी पवार यांनी आज मा. शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य...
Posted by Nilesh Lanke on Sunday, 9 May 2021
मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत. जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेऊन अत्याधुनिक, सुसज्ज असे ‘शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर ’ या नावाने पुन्हा एकदा भाळवणी येथे कोविड सेंटर सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही निलेश लंके यांनी लोकांसाठी कोविड सेंटर उभारलं होतं. त्याची पोहोच पावती म्हणून ‘लोकमत’ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ या पुरस्कारने सन्मानित केले होते, असं निलेश लंके यांनी सांगितले.
धान्याचा विचार केला तर 9-10 ट्रक धान्य आलं आहे- निलेश लंके
धान्याचा विचार केला तर 9-10 ट्रक धान्य आलंय. भाजीपाल्यासाठी रांग लागतेय. विशेष म्हणजे पुढील 1-2 महिन्यांसाठी जेवणाच्या पंक्ती बुक झाल्यात. जेवण कुणी द्यायचं, नाष्टा कुणी द्यायचा, ड्राय फ्रूटस् कुणी द्यायचे, फळ कुणी द्यायचं हे आधीच ठरलंय. एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जसं लोकं मदत करतात. अगदी तशीच मदत मिळत आहे. विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्यात शिर्डी साईबाबांचं देवस्थान आहे. तेथे ज्याप्रमाणे दान दिलं जातं, तसंच दान येथेही मिळत आहे.
निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक
आपल्या या कोविड सेंटरवर लंके हे स्वत: लोकांसाठी झटत आहे. रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणं, ताप, रुग्णांची विचारपूस अशी अनेक कामं ते करताना दिसतात. याशिवाय या ठिकाणी असलेल्या लोकांना पौष्टीक आहारदेखील पुरवला जातो. तसंच दिवसातून दोन वेळा रुग्णांची तपासणीही केली जाते. त्यांच्यासाठी योग, काही सांस्कृतिक कार्यक्रमही याठिकाणी आवश्यक ती काळजी घेऊन राबवले जातात. लंके यांच्या या कामाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून त्यांना मदतीचा ओघही सुरू झाला आहे. पहिल्या लाटेतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेल्या कोविड सेंटरची दखल शरद पवार यांनी घेतली होती.