लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घर विकत घ्यावे की भाडेतत्त्वावर? असा संभ्रम गृह खरेदीदारांपुढे आहे. दुसरीकडे घराच्या खरेदीस हा उपयुक्त कालखंड असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.
कोरोनामुळे २० वर्षांत सर्वात कमी म्हणजेच ६.८५ टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध आहे. विक्रीसाठी उपलब्ध असलेली ६६ टक्के घरे ही ८० लाखांपेक्षा कमी किमतीची आहेत. आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी विकासकांनी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्याशिवाय पाच वर्षे भाड्याच्या घरात राहण्यासाठी जेवढे पैसे मोजावे लागतील ती रक्कम काही अंतरावरील घराच्या किमतीच्या २७ ते ५४ टक्के असेल. त्यामुळे सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात आर्थिक स्थैर्य असेल तर भाडेतत्त्वावरील घरांपेक्षा घर खरेदीची उत्तम संधी असल्याचे निरीक्षण मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार संस्थांनी व्यक्त केले आहे.
स्वत:चे घर खरेदी करावे की भाडेतत्त्वावरील घरांतच राहावे, असे संभ्रमाचे वातावरण अनेक कुटुंबांमध्ये कायमच असते. सध्याच्या कालखंडात केलेली घरांची खरेदी ही भविष्यात निश्चितच फायदेशीर ठरू शकते, असे मत अॅनरॉक प्रॉपर्टी कन्सल्टंटचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी व्यक्त केले आहे. सध्या गृहनिर्माण क्षेत्रातील वातावरणाचा अभ्यास करून आपल्या भूमिकेमागची कारणेही अॅनरॉकने स्पष्ट केली आहेत. लॉकडाऊनमुळे घरांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. विकासक आपली आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या घरांची तातडीने विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अनेक सवलतींचा वर्षाव सध्या सुरू आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर बाजार जेव्हा स्थिरस्थावर होईल तेव्हा या सवलती नसतील. त्यामुळे घर खरेदी करण्याची क्षमता असलेल्या कुटुंबांसाठी ही योग्य वेळ असल्याचे अॅनरॉकचे निरीक्षण आहे.
कोरोना संकटाच्या काळात अनेक कुटुंबांनी भाडेतत्त्वावरील घरांमध्ये राहण्याचे धोके ओळखले आहेत. त्यामुळे मालकीच्या घरांची निकड वाढली आहे. त्यामुळे जी कुटुंबे नव्या घराची स्वप्ने रंगवत आहेत आणि जेथे कुटुंबप्रमुखाची नोकरी सहिसलामत आहे त्यांनी घर खरेदीसाठी निश्चित प्रयत्न करायला हवेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.नजीकच्या शहरांतील घरे उपयुक्तमुंबई महानगर क्षेत्रातील एखाद्या शहरांत भाडेतत्त्वावर पाच वर्षे राहण्यासाठी जेवढे भाडे मोजावे लागते ती रक्कम त्याच भागांपासून नजीकच्या शहरांतील घरांच्या एकूण किमतीच्या सुमारे २७ ते ५२ टक्के इतकी असेल. त्यामुळे कमी किमतीत उपलब्ध असलेले घर आणि कर्जाचा विचार केल्यास घर खरेदी जास्त फायदेशीर ठरू शकते. वर्क फ्रॉम होमच्या या कालखंडात भाडेतत्त्वावरील छोटी घरे अनेकांसाठी त्रासदायक ठरली होती. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांत भाड्याच्या छोट्या घरात राहण्यापेक्षा थोड्या दूर अंतरावरील मोठ्या आणि मालकीच्या घरांमध्ये राहण्यास लोकांची पसंती असेल, अशी शक्यताही अॅनरॉकने व्यक्त केली आहे.