अमित महाबळ
जळगाव : कोरोना एकदा होऊन गेला म्हणजे पुन्हा होणार नाही, असे नाही. बरे तो कितीदा होईल याचेही निश्चित गणित नाही. ‘नो लिमिट’ एवढेच त्यावरील उत्तर आहे. तो कितीही वेळा होऊ शकतो, असा गंभीर इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
कोरोनाला आता फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्याला सोबत घेऊन जगण्याची लोकांना सवय झाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यात मास्कचे काम महत्त्वाचे आहे पण त्याचा वापर कमी झाल्याचे दिसते. कोरोनाची रुग्ण संख्या अजूनही पूर्णपणे शून्यावर आलेली नाही. त्यामुळे कोरोना हद्दपार झाला असल्याचे म्हणता येत नाही. कोरोना एकदा होऊन गेल्यावर पुन्हा होणार नाही, अशा विचारामध्ये अनेकजण असतात. मात्र, असे मानणे चुकीचे आहे. कोरोना एकाच व्यक्तीला किती वेळा होईल या प्रश्नावर ‘नो लिमिट’, असे उत्तर आहे. तो कितीही वेळा होऊ शकतो. जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी यामागील स्पष्ट केले.
हे आहे कारण
डॉ. किशोर इंगोले यांनी सांगितले, की कोरोना व अन्य आजारांचे विषाणू यामध्ये फरक आहे. व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे यावर त्याला कोरोना होणे वा ना होणे अवलंबून आहे. या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून नैसर्गिक संरक्षण (रोग प्रतिकार शक्ती) मिळाले पाहिजे. ते मिळत नाही म्हणून लस घेणे आवश्यक असते. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांच्यात कोरोना होण्याचे प्रमाण कमी आहे. अन्य आजारांच्या विषाणूंमध्ये रुग्णाच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती तयार होते आणि ती त्या आजाराशी सामना करण्यात तेवढीच परिणामकारक असते मात्र, कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरित्या प्रतिकार शक्ती तयार होत नाही.
टेस्टबाबात ही काळजी घ्या
कोरोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यास त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. यामधील ज्या रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह येईल त्यांना स्वाईन फ्लू झालेला असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी फिजिशियनचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. किशोर इंगाले यांनी सांगितले.
जळगाव शहरात १२ रुग्ण
गेल्या २४ तासांत जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जळगाव शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे, तर जिल्ह्यात १ रुग्ण आहे. सोमवारी जळगाव शहर वगळता जिल्ह्यात एकही रुग्ण नव्हता.
स्वाईन फ्लूची लक्षणे
ताप, घसादुखी, घशात खवखव होणे, खोकला, सर्दी, अंगदुखी व डोकेदुखी आदी लक्षणे जाणवत असल्यास गर्दीमध्ये जाऊ नये. मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी.
आजार टाळण्यासाठी
- साबण, तसेच स्वच्छ पाण्याने हात वारंवार धुवावेत, हस्तांदोलन टाळावे.- पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारातील वापर वाढवा.- धूम्रपान करू नका.- शिंकताना किंवा खोकताना हातरुमालाचा वापर करा.- हातरुमाल रोज बदला.