राज्यात कोरोनाचा १५ आॅगस्टपर्यंत उच्चांक! प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून गांभीर्याने उपाययोजना करा : उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 10:50 PM2020-07-30T22:50:02+5:302020-07-30T22:53:20+5:30
‘आम्ही होर्डिगवर चांगले दिसत असलो तरी सर्व कामाचा डोलारा अधिका-यावर आहे.
पुणे : सध्या पुण्या-मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, राज्यात कोरोनाचा १५ ऑगस्टपर्यंत उच्चांक गाठेल. त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात हळूहळू रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात होईल. यामुळे घाबरुन जाण्याची कोणतही गरज नाही, परंतु सर्व यंत्रणेने सतर्क राहून गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येथे पुण्यात सांगितले.
विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे अधिकारी कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी सोबत समन्वय साधून काम करण्याची गरज आहे. ‘आम्ही होर्डिगवर चांगले दिसत असलो तरी सर्व कामाचा डोलारा अधिका-यावर आहे. उरी पिक्चर सारखे तुम्ही सर्व अधिकारी माझे सैनिक असून, आता युध्दासारखी परिस्थितीत असल्याने झोकून देऊन काम करा, कोरोनाचे हे युध्द आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही करु, सांगत अधिका-यांचे मनोबल वाढविण्याचा मुख्यमंत्री यांनी प्रयत्न केला.
मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी मी अधिका-यांना यशाची कौतुकाने हवेत जाऊ नका असे स्पष्ट सांगितले आहे. मुंबईत देखील सुरुवातील प्रशासकीय यंत्रणेकडून केवळ आकडेवारी दाखवली जात होती, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितले मला आकडेवारीमध्ये रस नाही, तर एकाही रुग्णाची, नागरिकांची तक्रार आली नाही, तर चांगले काम झाले असे म्हणले, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिका-यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे, तसेच प्रत्येक प्रभाग अधिका-याने आपल्या प्रभागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी.
-----
पुण्यात आठ- दहा दिवसांत जम्बो रुग्णालये उभारा
पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने मुबंई सारखे जम्बो फॅसिलिटींज उभारण्याची गरज आहे. कोरोना प्रादुभार्वाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या, जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यात येत्या १५ आॅगस्टपर्यंत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे जम्ब हॉस्पीटल उभारण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल, यामुळे जॅम्ब हॉस्पीटलची उभारणी तातडीने येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. किमान एक जम्बो हास्पीटल तातडीने सुरु करण्याचे अधिका-यांकडून वधवून देखील घेतले.
-----------------
खासगी हॉस्पिटलच्या बिलांवर नियंत्रण ठेवा
मुंबईसारखे पुण्यात देखील खाजगी हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणारे बील प्रथम प्रशासनाने नियुक्त केलेल्या आॅडिटरने चेक करावे, ते शासनाच्या नियमानुसार बरोबर असल्याचे आॅडिटरने सांगितल्यानंतरच रुग्णांचे हॉस्पीटला बीलाचे पैसे द्यावेत, अशी यंत्रणा राबविल्यास तक्रारी येण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद होईल. व खाजगी हॉस्पीटलकडून होणारी नागरिकांची लूट देखील थांबेल, असे देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येथे सांगितले.