राजानंद मोरे -
पुणे : नागरिकांना सहजपणे माहिती मिळावी, या उद्देशाने शासनाची सर्व संकेतस्थळे अद्ययावत असणे अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रासह जगभरात ‘कोरोना’ या साथीच्या आजाराचा विळखा पडलेला असताना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र अद्ययावत माहितीचा ठणठणाट आहे. इंग्रजीतून मार्गदर्शक सूचना वगळता संकेतस्थळावर टोल फ्री क्रमांकही देण्यात आलेला नाही. त्यातुलनेत केरळ राज्याचा आरोग्य विभाग अद्ययावत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणूने थैमान घातलेले असल्याने जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ‘कोरोना’विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांतून उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाची संकेतस्थळे, टिष्ट्वटर, फेसबुक, माहिती पुस्तिका, पोस्टर याद्वारे माहिती प्रसारित केली जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे संकेतस्थळावरही कोरोनाविषयी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील नियंत्रण कक्ष, दैनंदिन माहिती, प्रवासी व नागरिकांसाठीच्या सूचना आदी माहिती देण्यात आलेली आहे. देशात केरळ राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सतर्क झालेल्या केरळ राज्य शासनानेही आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरकोरोनाविषयी माहिती दिली आहे. केरळनंतर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक ११ रुग्ण (शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत) आहेत. पण शासनाच्या संकेतस्थळावर मात्र माहितीचा ठणठणाट दिसून येत आहे.केरळ आरोग्य विभागाचे संकेतस्थळ उघडल्यानंतर लगेच २४ तास उपलब्ध असलेले राज्य कोरोना कॉल सेंटरचे सहा क्रमांक दिसतात. त्याखाली रुग्णाची तपासणी, विलगीकरण, रुग्णालयात भरती व घरी सोडण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा व राज्य नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक व राज्यातील दररोजची कोरोनाच्या रुग्णांचे आकडेही दिले जात आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कोरोनाविषयीच्या व्हिडीओसह अधिकारी व डॉक्टरांचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओही आहेत. ही सर्व माहिती इंग्रजी व मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आलेले नाही. संकेतस्थळावर केवळ ‘कोरोना आजाराच्या मार्गदर्शक सूचना’ देण्यात आल्या आहेत. पण या सूचनाही राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (एनसीडीसी) तयार केलेल्या असून त्या इंग्रजीमध्ये आहेत. याव्यतिरिक्त संकेतस्थळावर कोरोनाविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू या आजाराचा साधा उल्लेखही संकेतस्थळावर करण्यात आलेला नाही. देशात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. 000