Corona Maharashtra: जगासह भारतात कोरोनाने थैमान घातले. कोरोनाच्या दोन वर्षात संपूर्ण भारतात लाखो लोकांचा मृत्यू झाला. महराष्ट्रामध्येही मृतांचा आकडा 3 लाख आहे. या मृत्यूवरुन भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये 'धन्यवाद मोदीजी अभियाना'ची माहिती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात बबनराव लोणीकर बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. त्याकाळात तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे नुसत्या गप्पा मारायचे. त्यांनी काहीच कामे केली नाहीत, त्यांच्यामुळेच हे मृत्यू झाले, असा गंभीर आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे. तसेच, केंद्रातील सरकारने लस दिल्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचा जीव वाचला, असा दावाही लोणीकरांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, 'कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढून बारा कोटी लस विकत घेणार, असे राजेश टोपे म्हणायचे. पण, रोज हा मुखडा टीव्हीवर यायचा, नुसत्या गप्पा मारल्या आणि तीन लाख लोकांचा राज्यात मृत्यू झाला. राजेश टोपे पहिल्या दिवशी सांगायचे लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, नंतर म्हणायचे मोदीजी लस देत नाहीत. केंद्राने लस दिली नसती तर, अर्धा महाराष्ट्र रिकामा झाला असता,' असा आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.