मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, आता ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारने सुधारीत आदेशही काढले आहेत. या नवीन आदेशानुसार, ब्युटी पार्लरला आणि जिमला 50 टक्के क्षमतेने परवानगी असणार आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी जाता येणार आहे.
राज्यात कोरोनाच कहर वाढल्याने राज्य शासनाकडून काल नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे, यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले. आदेशात जिम आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता आज सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नव्या सुधारित आदेशानुसार 10 जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने आपल्या सुधारित आदेशात म्हटले, ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल.
राज्यात नवी नियमावली जाहीर- राज्यात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी आणि रात्री 11 ते सकाळी संचारबंदी - शाळा महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद- मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद - स्विमिंग पूल पूर्णपणे बंद- लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत- खासगी कार्यालयात 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी- 2 डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार- रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 पर्यंत सुरू - लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 जणांनाच परवानगी