मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने सरकारने हळूहळू सारे दरवाजे उघडले आहेत. मुंबईतही 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी ठराविक वेळेत लोकल सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी आता पुन्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. विविध जिल्ह्यांत रुग्ण वाढ होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यातच आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य आले आहे.
राज्यातील तसेच मुंबईतील वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. परंतू राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले आहेत. (Corona Patient increasing in state.)
मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय का? तर लोकल सेवा सुरु झाल्यापासून १५ दिवसांची आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरू शकते. परंतु मुंबईत कोरोना(Corona Patient) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लोकलमधील प्रवाशांची वाढती गर्दी याला जबाबदार आहे याबाबत अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत. १० फेब्रुवारीला मुंबईत ५५८ कोरोना रुग्ण आढळून आले तर सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ३६९ असल्याची माहिती आहे. आतापर्यंत ११, ४०० मृत्यूचा आकडा नोंदवला आहे. ९ फेब्रुवारीला ३७५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ मृत्यू झाले होते, अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने या आकडेवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टेंसिंगचं पालन होत नाही. १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत राज्य सरकारने सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. तेव्हापासून दिवसाला ३० लाखांहून अधिक लोक उपनगरीय रेल्वेतून प्रवास करत आहेत. आता १० दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीकडे सर्वांचे लक्ष जात आहे. तज्ज्ञांच्या मते रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याला लोकल ट्रेनमधील गर्दीला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, काहींच्या मते, आठवड्याच्या शेवटी चाचणीची संख्या कमी होते आणि आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा चाचणी वाढते.