मुंबई : राज्यात सर्व व्यवहार हळूहळू सुरू झाले असताना नागरिकांनी आरोग्य विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याने कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मास्क न घालणे, शारीरिक अंतर न पाळणे, अनावश्यक गर्दी करणे, स्वच्छता न पाळण्याच्या बेफिकिरीमुळे राज्यात डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा १४ फेब्रुवारीला एकाच दिवसात सर्वाधिक चार हजारांच्या वर रुग्ण आढळले आहेत. ६ जानेवारीला राज्यात एकाच दिवसात चार हजारांवर रुग्ण आढळले होेते. एकप्रकारे ही धोक्याची घंटाच आहे.मुंबईत लोकल सुरू झाल्यानंतर गर्दीचे योग्य नियंत्रण करणे शक्य न झाल्याने चार हजारांवर ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई आदी महापालिकांमध्ये नियमांची सर्रास पायमल्ली सुरू असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. ठाण्यात ४७४०, पुण्यात ६२१६ तर नाशिकला १३७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ व नागपूर या प्रमुख शहरांत वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. अमरावतीत फेब्रुवारीच्या १२ दिवसांत २५४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात दीड महिन्यात ३८ जणांचा मृत्यू झाला. गडचिरोलीत १ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत ३७६ जण बाधित झाले. वर्धा जिल्ह्यात दीड महिन्यात ४६ मृत्यू झाले.
धोक्याची घंटा- एकाच दिवसात ४,०९२ नवे रुग्ण- मुंबईत ४,७४० ॲक्टिव्ह रुग्ण- ठाणे जिल्ह्यातही रुग्णांचे वाढते प्रमाण- पुण्यात ६,२१६ ॲक्टिव्ह रुग्ण- नाशिकला १,३७९ ॲक्टिव्ह रुग्ण- विदर्भात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ