मुंबई : दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट निघाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावर केलेल्या 'क्यू आर' कोड तपासणीत ही बाब उघड झाली. त्यामुळे संबंधित प्रवाशांना प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या प्रवाशांना दोन वेळा कोरोना चाचणी करावी लागते. पहिली ४८ तास आधी आणि दुसरी ६ तास आधी या चाचण्या कराव्या लागतात. सहा तासांत अहवाल मिळणे शक्य नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने ४ हजार ५०० रुपये मोजून जलद चाचणी करावी लागते. तिचा अहवाल केवळ १३ मिनिटांत मिळतो.प्रवाशांनी सादर केलेल्या अहवालावरील 'क्यू आर' कोड तपासल्याशिवाय तो मंजूर केला जात नाही. १२ नोव्हेंबरला मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांचा जलद चाचणी अहवाल 'क्यू आर'द्वारे तपासला असता त्यातील माहितीत तफावत दिसून आली. सुमारे ४० प्रवाशांचा अहवाल अशा प्रकारे बनावट आल्याने सर्वांनाच धक्का बसला. संबंधित प्रवाशांना विमान प्रवास करण्यापासून रोखण्यात आलेच, शिवाय जलद आरटीपीसीआर चाचणीसाठी केली जाणारी पूर्वनोंदणी प्रक्रियाही थांबविण्यात आली, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.
स्वतंत्र नोंदणी कक्ष आणि चाचणी- दुबईला जाणाऱ्या प्रवाशांकरिता मुंबई विमानतळ प्रशासनाने टर्मिनल २ वर (गेट क्रमांक ८) विशेष प्रवेशद्वार आरक्षित केले आहे. तेथील निर्गमन हॉलमध्ये स्वतंत्र नोंदणी कक्ष, चाचणी आणि प्रतीक्षागृहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.- प्रवाशांनी सादर केलेल्या क्यू आर कोडमधील माहितीत तफावत का आढळली याची चौकशी करण्यात येणार आहे.