मुंबई - कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. आगामी काळात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधता म्हणून महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मात्र 5 एप्रिल रोजी होऊ घातलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार की नाही यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 17 कोरोना व्हायरस बधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक पुण्यात आहेत. तर नागपूर, ठाणे आणि मुंबई येथेही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून इतर सर्वाजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत राज्यसेवा पूर्वपरिक्षा होणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. स्पर्धा परिक्षेची करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुण्यात सर्वाधिक आहे. तसेच बाहेरगावची मुलं देखील परिक्षा केंद्र म्हणून पुण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे 5 एप्रिल रोजी पुण्यात परिक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होणार आहे. अर्थात या कालावधीत कोरोना अधिक पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
दरम्यान परिक्षेला 20 दिवस शिल्लक आहेत. मात्र गर्दीच्या कारणाने परिक्षा पुढे ढकली जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मात्र हे निश्चित नाही. अशा स्थितीत गावी जावं की, पुण्यात थांबून परिक्षेची तयारी करावी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे परिक्षा होणार की नाही, याविषयी आयोगाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
अनेक अभ्यसिका आधीच बंद
पुण्यात सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसरात अनेक अभ्यासिका आहेत. मात्र कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर अनेक अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. तर रुमवर अभ्यास होणे कठिण आहे. त्यातच परिक्षा होणार की नाही, हे निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळले आहेत.