सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे दरवर्षी दत्त जयंतीला भरणारा घोडेबाजार सुप्रसिद्ध आहे. मात्र कोरोना महामारीमुळे यंदाचा यात्रोत्सवच रद्द झाल्याने घोडेबाजारही भरणार नाही. यामुळे सुमारे ५० कोटींची उलाढाल थांबली आहे.
सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथे यात्रोत्सवानिमित्त घोडेबाजार भरवण्याची परंपरा आहे. या घोडेबाजारात राजस्थानातील पुष्कर येथील यात्रोत्सवानंतर देशात दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार मानला जातो. घोडेबाजाराची ख्याती जगभर व्हावी, यासाठी आयोजकांकडून येथे दरवर्षी चेतक फेस्टिव्हल आयोजित केला जातो. सारंगखेडा येथील यात्रोत्सवात उमदे घोडे विक्रीसाठी येतात. या घोडेबाजारातून सरासरी ८ कोटींपर्यंत उलाढाल होत होती.
सोबतच देशातील विविध पशुमेळ्यात नावाजलेले कोट्यवधी रुपये किमतीचे घोडेही येथे हजेरी लावत असल्याने त्यांना पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने अश्वप्रेमी घोडेबाजाराला भेट देत होते. घोडेबाजारावर घोड्यांसाठी लागणारा साज, विविध गरजेच्या वस्तू, चारा, खाद्य खरेदी-विक्रीतून चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होत होती. शेतकऱ्यांची यात्रा असाही नावलाैकिक यात्रोत्सवाचा आहे. बैलगाडे, शेती साहित्य, शेती औजारे यातून दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत होती.