पुणे : वन्यप्राण्यांचे जतन आणि संवर्धन याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. हौस म्हणून आपण काय काय खाणार आहोत? कोरोना व्हायरस कोणत्या प्राण्यातून आला आहे, हे अजून कळलेले नाही. जगाचा नाश करायला एक विषाणू पुरेसा आहे. कोरोनाने जगाला मोठा धडा शिकवला. आता तरी आपण जागे होणार आहोत का, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी उपस्थित केला. निसर्गाचा समतोल न साधल्यास ऑस्ट्रेलियातील जंगल जळण्यासारखे प्रकार आपल्याकडे घडायला वेळ लागणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.राजहंस प्रकाशनातर्फे टेरी इरविन यांनी लिहिलेल्या आणि सोनिया सदाकाळ-काळोखे अनुवादित ‘स्टीव्ह आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज रविवारी (दि. १ मार्च) डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून आरती गोगटे उपस्थित होत्या. आमटे म्हणाले, ‘आपणच निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. त्यामुळे मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे, हे आपल्याला अजून समजेलेले नाही. मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी सगळ्यांशीच माझा जवळून संबंध आला. यापैकी कोण सर्वात चांगले, असे मला विचारल्यास मी एकही क्षण न दवडता, वन्यप्राणी हेच उत्तर देईन. कारण प्राण्यांकडून मिळणारे प्रेम, विश्वास अद्भुत आहे. माणसांबद्दल अशी हमी देता येणार नाही.’मंदाकिनी आमटे म्हणाल्या, ‘माझ्यासाठी प्राणी केवळ पुस्तक किंवा संग्रहालय एवढ्यापुरतेच मर्यादित होते. लग्न झाल्यावर प्राण्यांशी थेट संबंध आला. नातवांमुळे स्टीव्ह माहीत झाला होता. प्राणी जवळचे मानलेच; प्राण्यांचा तारणहारही जवळचा वाटू लागला. स्टीव्ह गेला नाही, तो अमर आहे.’डॉ. सदानंद बोरसे यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. आरती गोगटे, सोनिया सदाकाळ-काळोखे यांनी विचार मांडले. शर्वरी जमेनीस यांनी सूत्रसंचालन केले.-----------------स्टीव्ह भारतात जन्माला आला असता आणि मगरीच्या मागे लागला असता तर माहिती अधिकार शस्त्राचा वापर करून येथील लोकांनी त्याचे जगणे मुश्कील करून टाकले असते. प्राणीमित्रांचे कर्तृत्व आपण लक्षात घेतले पाहिजे. जतन, संवर्धन न केल्यास प्राणी केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहतील. प्राण्यांसाठी आपल्याकडे योग्य धोरणच नाही. शासनाने याबाबत ठोस भूमिका घेतली पाहिजे.- विश्वास पाटील
कोरोनाने जगाला धडा शिकवला : डॉ. प्रकाश आमटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 19:11 IST
हौस म्हणून आपण काय काय खाणार आहोत?
कोरोनाने जगाला धडा शिकवला : डॉ. प्रकाश आमटे
ठळक मुद्देसोनिया सदाकाळ-काळोखे अनुवादित ‘स्टीव्ह आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन