लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोना चाचणीसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराऐवजी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या खाजगी प्रयोगशाळांना नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रयोगशाळांची मान्यता रद्द करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
कोरोना चाचणीसाठी खाजगी प्रयोगशाळा अतिरिक्त शुल्क आकारीत असल्याचे पालिकेच्या निर्दशनास आले आहे. याची गंभीर दखल घेत महापौर महापौरांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात सोमवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे, उप आरोग्य अधिकारी टिपरे, विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त दर आकारणाऱ्या खासगी प्रयोगशाळांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांची झाडाझडती घेण्याची सूचना महापौरांनी केली. या तपासणीमध्ये एखाद्या प्रयोगशाळेत अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांना नोटीस देऊन समज देण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी दिले. मात्र नोटीस बजाविल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करीत असणाऱ्या खासगी प्रयोगशाळांची मान्यता रद्द करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.