उदयकुमार जैन
औरंगाबाद : कोरोनामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील जवळपास ५०० कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. लेणीत येणारा पर्यटकच येथील व्यावसायिकांसाठी ‘अतिथी देवो भव’ असला तरी कोरोनाने त्याची वाट रोखल्याने लेण्याचे अर्थकारण शून्यावर आले आहे.
१७ मार्चपासून लेणी बंद आहे. सध्या पाऊस चांगला झाल्याने लेणीवर निसर्गसौंदर्याची उधळण होत असली तरी सन्नाटा बघायला मिळत आहे. १५ आॅगस्टनंतर येथील ‘पीक सीझन’ सुरू होतो आणि तो फेब्रुवारीपर्यंत चालतो. वर्षभरात सरासरी ४ लाखांवर देशी-विदेशी पर्यटक येथे येतात व यातून पाच कोटींची आर्थिक उलाढाल होते; परंतु ती ठप्प झाली आहे. याचा फास मात्र स्थानिक कामगार, मजूर, नोकर, व्यावसायिकांना बसला आहे. लेणीच्या टी-पॉइंटवर पर्यटकांना खरेदीसाठी एमटीडीसीने ७८ दुकाने बांधलेले आहेत. शिवाय पार्किंग, लेणी दर्शन तिकीट, डझनभर प्रदूषणमुक्त बस, उपाहारगृहे, लॉज, हॉलीडे रिसॉर्ट, रिक्षाचालक, सफाई कामगार, ४० डोलीवाले, १०० फेरीवाले, १० गाईड, पोस्ट कार्ड व गाईड बुक विक्रेते, भेळपुरीचालक, रंगीबेरंगी दगड विक्रेते, छोटे-मोठे हॉटेल्स असा येथील एकंदरीत दैनंदिन धांडोळा. यातून परिसरातील फर्दापूर, अजिंठा गाव, सावरखेडा, लेणापूर, ठाणा, वरखेडी, पिंपळदरी येथील जवळपास ५०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो; परंतु १७ मार्चपासून या सर्वांची आमदनी बंद झाल्याने आता लेणी पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे.
आर्थिक संकटाचे सलग तिसरे वर्षगेली दोन वर्षे रस्त्याची समस्या त्यात यंदा कोरोनाने भर टाकली. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही लेणींचे अर्थचक्र थांबल्याने एमटीडीसीने दुकानदारांचे दोन वर्षांचे भाडे, वीज बिल माफ करावे, बँकेने बिनव्याजी कर्ज द्यावे, शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे, प्रकल्पधारकांना ९९ वर्षांच्या करारावर शेती कसायला द्यावी, रोजगारनिर्मिती करावी. -पपिंद्रपालसिंग वाय.टी. (माजी अध्यक्ष, अजिंठा लेणी दुकानदार संघटना व एटीडीएफ सदस्य)एमटीडीसीलाही लाखोंचा फटकालेणीतील आमचे उपाहारगृह, पर्यटक निवास व इतर सुविधा केंद्र बंद असल्याने लाखोंचा फटका बसला आहे; परंतु कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलेले नाही. त्यांच्या माध्यमातून सर्व वास्तू मेन्टेन ठेवल्या जात आहेत. पर्यटक येताच त्यांची गैरसोय होणार नाही. -अखिलेश शुक्ला, प्रादेशिक महाव्यवस्थापक, एमटीडीसी, औरंगाबाद