मुंबई: देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोना लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी असल्याची खंत राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली. लोकमतशी बोलताना डॉ. संजय ओक यांनी लसीकरणावर प्रतिक्रिया दिली. (corona task force chief dr sanjay oak react on vaccination programme)
कोरोना लसीकरण कार्यक्रमाबाबत मी अत्यंत असमाधानी आहे. कारण यामध्ये नियोजनाचा अभाव आहे. लसींचे डोस कमी आहेत, हा एक भाग झाला. परंतु, सीरमचे अदार पुनावाला यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील दोन ते तीन आठवड्यात यातून मार्ग निघू शकेल. परंतु, लसीकरणाच्या नियोजनाचा अभाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात टास्क फोर्सने अनेक सूचना केल्या, अशी माहिती डॉ. संजय ओक यांनी दिली. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी डॉ. ओक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. ओक बोलत होते.
...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा
बीकेसीमध्ये लसीकरण केंद्र नकोच
बीकेसी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. तेथेच लसीकरण केंद्र असू नये. बीकेसी येथे कोरोनावर उपचार केले जातात. कोरोना नसलेली लोकं तेथे गेल्याने त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी काही अंतरावर दुसरीकडे कोरोना लसीकरण केंद्र उभारा आणि तेथे केवळ लसीकरण करा, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे, अशी माहिती डॉ. ओक यांनी दिली.
कार पार्कमध्ये लसीकरण स्वागतार्ह
मुंबईमध्ये वाहनामध्ये कोरोना लस देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस दिल्यानंतर काही त्रास होऊ लागल्यास तेथे इमर्जन्सी सेवा उपलब्ध असलीच पाहिजे. लस दिल्यानंतर अर्ध्या तास थांबायचे आहे. वृद्ध नागरिकांना त्रास होत नाही ना, याबाबत चौकशी करायला हवी, अशी काही सूचना देण्यात आल्या आहे. तसेच कोरोना लसीकरण देताना बॅचेच करा. अधिक प्रौढ नागरिकांना सकाळच्या वेळेत बोलवणे योग्य होईल, असाही सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीच्या प्रांगणात, गावागावातील मोकळ्या मैदानात लसीकरण केंद्र असावे, अशी सूचनाही टास्क फोर्सने केली आहे, अशी माहिती डॉ. ओक यांनी दिली.
विकेंद्रीकरण होणे महत्त्वाचे
कोरोना लस घेण्याऱ्यांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे या गोष्टींचे शक्य तेवढे विकेंद्रीकरण केले पाहिजे. तरच गुंता सुटू शकेल. तशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे, असेही डॉ. ओक म्हणाले. तसेच खासगी रुग्णालयांना सामावून घेतल्याशिवाय लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी होणार नाही, असे माझे आणि टास्क फोर्सचे स्पष्ट मत आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांना थेट कंपनीमधून लस घ्या, असे सांगणे चुकीचे आहे. कोणतेही खासगी रुग्णालय कंपनीशी थेट संपर्क वा संबंध ठेवत नाही. तसेच खासगी कंपनीही खासगी रुग्णालयांना दाद लागू देत नाही. या सर्वांची एक प्रक्रिया असते आणि तीच पाळली जाते. लसीचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोल्डचेन मेंटेनन्स आणि तो पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा कोरोना लसींची परिणामकारकता संपून जाईल, असे सांगत खासगी रुग्णालयांचा सामावून घेतले पाहिजे. वितरकांवर सरकारचेच नियंत्रण हवे. तरच अन्याय न होता ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील, असे डॉ. ओक यांनी नमूद केले.