मुंबई : देशातील प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. लवकरच लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार होईल. काही राज्यांमध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रातही नऊ कोटी लसीकरण झाले असून राज्यांच्या मागणीनुसार लस पुरवल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माध्यमांना सांगितले. तर, लसींवरून टीका करणाऱ्यांनी आता नऊ कोटींचा टप्पा गाठला म्हणून कौतुक करायला हरकत नाही, असा टोलाही महाविकास आघाडीतील पक्षांना लगावला. देशातील लसीकरणाचा आकडा शंभर कोटींजवळ पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भारती पवार यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. लवकरच भारतात एका इतिहासाची नोंद होईल. शंभर कोटी लसीकरणाचा आकडा आपण पार करू. एकेकाळी लस आणायला वर्षानुवर्षे लागायची मात्र यावेळी लवकरच लस उपलब्ध केली गेली. आजही युद्धपातळीवर लसीकरणाचे काम सुरू आहे. लसीसाठी ३५ हजार कोटींची तरतूदही करण्यात आली होती. नऊ महिन्यात यशस्वीरित्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात आले. जगातील अनेक देश भारताच्या या कामगिरीचे कौतुक करीत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळायला हवी याकडे मोदींनी लक्ष दिल्याचे सांगतानाच इतक्या मोठ्या प्रमाणातील लसीकरण टीम वर्कमुळे शक्य झाल्याचेही भारती पवार म्हणाल्या. आता लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी सुरू असल्याचे सांगून पवार म्हणाल्या की, आवश्यक परवानग्या, मान्यता मिळताच लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल. अद्याप दुसऱ्या लाटेचे संकट टळले नाही. शिवाय, तिसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकार तिसऱ्या लाटेवर लक्ष ठेवून असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Corona Vaccination: नऊ कोटी लसीकरणाचे कौतुकही करायला हवे; भारती पवारांचा राज्य सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 7:56 AM