नाशिक : कोरोनाची लस न घेताच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु, दुसरा डोस घेण्याची तारीख येण्यापूर्वीच लस घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होणे आणि तेसुद्धा परराज्यातून. हा अजब प्रकार घडला आहे नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील युवकाबाबत. सचिन सांगळे या युवकाने गेल्या ७ ऑगस्ट २०२१ रोजी नांदूरशिंगोटे येथील केंद्रात पहिला डोस म्हणून कोविशिल्ड लस टोचून घेतली होती. दुसऱ्या डोससाठी त्यांना ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२१ यादरम्यानची मुदत देण्यात आली आहे. तत्पूर्वीच दि. २२ ऑक्टोबर रोजी या युवकाला मोबाईलवर दुसरा डोस घेतल्याचा मेसेज आला. हा मेसेज पाहिला असता सांगळे चक्रावून गेले. त्यांना दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले, तेसुद्धा छत्तीसगढ प्रांतातील रालगढ येथील अलोला केंद्राचे. त्यामुळे सांगळे आणखीनच पेचात सापडले.
लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करताना अनवधानाने एखाद्या ठिकाणी मोबाईल क्रमांकातील एखादा क्रमांक चुकीचा गेला, तर असा प्रसंग घडतो. त्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. - डॉ. मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर.