राज्याच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सीबीआयच्या कार्यालयात कार्यालयात शनिवारी कोरोना स्फोट झाला. येथे तब्बल 68 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. येथील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सीबीआयचे कार्यालय आहे.
सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयात काम करणाऱ्या 235 कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. यांपैकी 68 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
यापूर्वी, शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांतील जवळपास 93 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यानंतर, आता मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांचा आकडा 9,657 वर पोहोचला आहे, यांपैकी जवळपास 123 जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या 409 बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत तिसऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण -राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई कोरोनाचे पुन्हा एकदा केंद्रस्थान बनत चालले आहे. मुंबईत काल आणि आजही तब्बल २० हजारांवर रुग्णांची नोंद झाली. रुग्णवाढीचा वेगही सातत्याने वाढताना दिसत आहे. मात्र, महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी लॉकडाऊनची गरज नसल्याचे विधान केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज पुन्हा दिवसभरात मुंबईत 20,318 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत.