कोरोना महामाराशी सामना करण्यासाठी लॉकडाउन गरजेचा आहे, पण यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. कोणाला वेळेवर अन्न मिळत नाहीये, तर कोणी आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडला आहे. मात्र त्यांची व्यथा ऐकणारा कोणीच नाही. मुंबईतही अशीच एक घटना घडली आहे. कपडे व्यापारी अतुल श्रीवास्तव बिहारमधून आपल्या पत्नीवर उपचार करण्यासाठी ९ मार्चला मुंबईत आले, दरम्यान, लॉकडाउनमुळे आता ते इथेच अडकून आहेत. इतकेच नाही तर अतुल यांनी जीवंत पत्नीच्या अंत्यसंस्काराची देखील तयारी करून ठेवली आहे. पत्नी वंदना आणि लहान बहिणीसह अतुल मुंबईच्या परळमध्ये राहत आहेत.
अतुल यांच्या पत्नीची अंतिम इच्छा आहे की तिला एकदा आपल्या मुलांना भेटायचे आहे, त्यांना डोळे भरून पहायचे आहे. परंतु रुग्णवाहिकेतून पत्नीला बिहारला नेण्यासाठी अतुल यांच्याकडे पुरेसे पैसेही नाहीत. मुंबईतून बिहारला घेऊन जाण्यासाठी ७० हजार रुपये खर्च लागणार आहे. आणि आता अतुलकडे फक्त तीन हजार रूपये बाकी आहेत. वंदना गेल्याकाही दिवसांपासून आजारी आहे. मूत्रपिंडाचा कर्करोगाने वंदना पिडीत आहे. दिवसेंदिवस वंदनाची तब्येत आणखी खालावत आहे. तिच्या उपचारासाठी अतुल यांनी पत्नीला केईएम रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होतो. उपचार सुरू असल्यामुळे रूग्णालया जवळच अतुल यांनी एक खोली भाड्याने घेतली.
बायकोवर उपचार सुरू असताना कोरोना विषाणूने त्यांच्यात आणखीन विघ्न टाकले आहे. लॉकडाऊन देशभरात घोषित केल्यामुळे अतुल पत्नीला घेवून घरी बिहारमध्येही जाऊ शकत नाही. अतुल यांनी पत्नीच्या उपचारासाठी गेल्या वर्षभरात सुमारे 10 लाख रुपये खर्च केले आहेत. तरीही अतुल यांच्या हाती यश आलेले नाही. कधीही त्यांची पत्नी त्यांना सोडून जाऊ शकते. याची मनाची तयारी आता अतुल यांनी देखील केली असावी. म्हणून पत्नीसह अतुल यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आहे.