मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या १३ जण मुंबईत तर दोघेजण पुणे येथे भरती आहेत. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९०४ विमानांमधील १ लाख ९ हजार ११८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावरही स्क्रिनिंग सुरू झाले आहे.
आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५६० प्रवासी आले असून, ३०५ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत २७३ जण भरती करण्यात आले आहे.
आजपर्यंत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या रूग्णांपैकी २५८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल उद्या प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २७३ प्रवाशांपैकी २५८ जणांना आतापर्यंत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तरीही त्यांच्या उपचारांबाबत वेळोवेळी माहिती घेण्यात येणार आहे.एसटी महामंडळातही कोरोनाविषयी जागृतीदेशात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने, प्रत्येक विभागाद्वारे कोरोना विषाणूविषयी जागृती केली जात आहे. आता एसटी महामंडळाकडून कोरोनाविषयी प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग हवेमार्फत होतो. परिणामी, श्वसनाचे आजार झालेल्या व्यक्तींशी संपर्क करताना विशेष काळजी घ्यावी. एसटीचे वाहक आणि चालक यांचा सर्वांशी थेट संबंध येतो. त्यामुळे वाहक आणि चालकांनी हस्तांदोलन करणे टाळावे, खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे, अशा उपाययोजना महामंडळाकडून सांगण्यात आल्या आहेत. दररोज बस स्थानक, प्रसाधनगृह व परिसराची स्वच्छता करण्यात यावी, प्रसाधनगृहांची जंतुनाशकांचा वापर करून स्वच्छता करण्यात यावी. वाहकांनी प्रत्येक प्रवाशाला कोरोनाबाबत जागृती करावी, अशाही सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.कोरोनापासून बचावाची मोबाइलवर कॉलरट्यूनजगभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने भारतातही काळजी घेतली जात आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न सर्व स्तरांवर केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता मोबाइलद्वारे केल्या जाणाºया कॉलवर प्रत्येक वेळी कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत कॉलरट्युनद्वारे माहिती दिली जात आहे. कॉल केला की लगेच खोकला ऐकू येतो आणि पुढे कोरोनापासून वाचण्याचे मार्ग व काय उपाययोजना कराव्यात, त्याची माहिती दिली जात आहे.