मुंबई : राज्यात रविवारी १२,५५७ रुग्णांचे निदान झाले असून, २३३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,३१,७८१ झाली असून, मृतांच्या आकडा १ लाख १३०वर पोहोचला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून दोन लाटांवर राज्य शासनाने नियंत्रण मिळविले आहे. मात्र, दुसरीकडे कोविडने एक लाखाहून अधिक जणांचे प्राण घेतले, ही चिंताजनक बाब आहे.राज्यात १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात एकूण १,८५,५२७ सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर १.७२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली- राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण २१ हजार २१६ इतके रुग्ण आहेत. - मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ४१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.