बारामती : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल)सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता शहरातील कोरोना संशयिताची शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करणे शक्य होणार आहे.मात्र, त्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.वैद्यकिय शिक्षण विभागाने याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालकांना सुचना दिली आहे. १५ एप्रिल रोजी याबाबत निर्णय घेण्यात आला.यामध्ये बारामतीसह कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, नांदेड व अंबाजोगाई येथील वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुख व संचालनालयावर देण्यात आली आहे. प्रयोगशाळा संबंधित संस्थेस उपलब्ध होणाऱ्या राज्ययोजनांसह जिल्हावार्षिक योजना,महात्मा फुले जन आरोग्य योजना आदी उपलब्ध निधीतुन स्थापित करावी. तसेच संबंधित संस्थेतील उपलब्ध मनुष्यबळातून प्रयोगशाळाचालविण्याची सुचना शासनाने दिली आहे.बारामती शहरात सात कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळले आहेत. सातव्या रुग्णाशी सबंधित १६ जण पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी १४ जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.उर्वरीत दोघांचे अहवाल शुक्रवारी(दि १७) मिळणे अपेक्षित आहे.शासनाच्या आजच्या सुचनेनुसार या ठिकाणी कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाआहे.मात्र,याबाबत प्रयोगशाळा सुरु करावी लागणार आहे. प्रयोगशाळा उभारणी, आवश्यक यंत्रणा,मनुष्यबळाची उपलब्धता यावर अवलंबुन आहे. तोपर्यत बारामती येथील संशयित रुग्णांना पुणे येथील तपासणी यंत्रणेवर अवलंबुन राहावे लागणार आहे.पुणे येथे संशयित रुग्ण नेणे—आणने,तपासणीची प्रक्रिया वेळखाऊ आहे.त्यामुळे बारामती येथे संबंधित प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी होत आहे.याबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे येथील वैद्यकीय महाविदयालयाचे प्रमुख संजीवकुमार तांबे यांनी सांगितले .
Corona virus : बारामतीसह राज्यात सहा ठिकाणी होणार कोरोनाचे निदान; राज्य शासनाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 8:36 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविद -१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता
ठळक मुद्देबारामतीकरांना प्रयोगशाळा उभारणीची प्रतीक्षा