दीपक कुलकर्णी -पुणे : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी लागली तसेच सर्व प्रकारच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आगामी काळात राज्यातील शिक्षणाचा गाढा पूर्वपदावर आणण्यासाठी विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये यांच्याशी चर्चा करुन उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरु आहे. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन पर्याय शोधण्यात येत आहे. मात्र, तरी त्यातून आजमितीला समाधानकारक मार्ग निघाला आहे असे ठोसपणे म्हणता येणार नाही. त्याच धर्तीवर लातूर व पुणे येथील मित्रांनी एकत्र येत अतिशय सोप्या पध्दतीच्या एका 'एडोफॉक्स' या अॅपची निर्मिती केली असून त्याद्वारे विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक संस्था यांना ऑनलाईन शिक्षणाचा एक सक्षम व सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शैक्षणिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून शिक्षण सुरु ठेवण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. त्यात झूम, मिंट, गुगल अॅपसारख्या विविध ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करुन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येत आहे. पण त्यातल्या अतिशय किचकट पध्दत, किंवा तांत्रिक अडचणी, रेंजचा प्रॉब्लेम किंवा डेटा लीक होण्यासारखी भीती यामुळे काही प्रमाणात शिक्षक, विद्यार्थी आणि पालक संभ्रमावस्थेत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर पुणे व लातूर येथील सॉफ्टवेअर कंपनीच्या अजिंक्य कुलकर्णी, आनंद कोरे यांनी एकत्र येत 'एडोफॉक्स'नावाच्या सहज व सोप्या अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या निर्मिती व व्यवस्थापनासाठी एकूण १० जणांची टीम कार्यरत आहे. सुरुवातीचे काही दिवस हे अॅप तुम्हांला मोफत हाताळण्यास मिळणार आहे. पूर्णपणे सुरक्षित डेटा, अनलिमिटेड वेळ, सभासद, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था, सहज व सोपी लॉगिनची पध्दत, मेसेज बॉक्सची सोय, अशा विविध बाबी या अॅपमध्ये समाविष्ट आहे. या अॅपच्या माध्यमातून मेडिकल, इंजिनिअरींग, राज्यसेवा, लोकसेवा यांपासून ते पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमासाठी सुध्दा हे अॅप उपयोगी ठरणार आहे. जवळपास तीन ते चार लाख सराव प्रश्न या अॅपवर उपलब्ध आहे.
या अॅपबाबत माहिती देताना अजिंक्य कुलकर्णी म्हणाले, सुरुवातीच्या काळात आम्ही पुणे, लातूर याठिकाणीच या अॅपची चाचणी घेतली. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करत हे अॅप अगदी सहज व कमी वेळेत विद्यार्थी, शिक्षक यांना कसे वापरता येईल यासाठी बारकाईने मेहनत घेत विकसित केले. आता बारामती, कोल्हापूर, सातारा, सांगली यांसारख्या ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थांकडून एडोफॉक्स या अॅपचा वापर सुरु आहे. तसेच पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्रभर हे अॅप उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे सरकारी पातळीवरसुध्दा अॅपविषयी काही करता येईल का याचा देखील विचार आम्ही करणार आहोत.
संकेत स्थळ -www.edofox.com........................................विद्यार्थी व शिक्षक अशा दोघांसाठी उपयुक्त....लॉकडाऊन जरी उठविण्यात आले तरी देखील तात्काळ शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा सरकार निर्णय घेणार नाही. त्यामुळे पुढील काही काळ या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक अशा दोघांसाठी उपयुक्त आहे. हे अॅप मोबाईल, लॅपटॉप ,व डेस्क अशा सर्व पातळीवर हे अॅप वापरता येणे शक्य आहे. तसेच एकाचवेळी जास्तीत जास्त होस्ट लेक्चर्स घेऊ शकतात किंवा अनलिमिटेड विद्यार्थी यामध्ये सहभाग नोंदवू शकतात.विद्यार्थी त्यांची संपूर्ण माहिती आणि सराव परीक्षांचा डेटा स्टोअर राहतो शिवाय कधीही पाहता येतो. शाळा, महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थांना कोणत्याही इयत्तेसाठी अॅप वापरता येणे शक्य आहे. - आनंद कोरे