Corona Virus: अजित पवारांनीही घेतला कोरोनाचा धसका; 'अशी' घेतात काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 05:39 PM2020-03-08T17:39:58+5:302020-03-08T17:53:08+5:30
राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज केरळ राज्यात ५ नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. या बरोबर भारतातील करोना रग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. कोरोनापासून जागरुकता राखण्याचा प्रयत्न जसे नागरीक करत आहेत तिच जागरुकता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दाखवली आहे.
अजित पवार यांनी आज बारामतीत झालेल्या विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी अजित पवार यांनी एकही व्यक्तीला हात न मिळवता, प्रत्येक ठिकाणी हात जोडून नमस्कार केला. यावर बोलताना कोरोनामुळे आपण हस्तांदोलन टाळत असून तुम्हीही अशीच काळजी घ्या, असा सल्ला अजित पवारांनी उपस्थितांना दिला.
अजित पवार म्हणाले की, लोकांना वाटेल मी उपमुख्यमंत्री झालो आहे. म्हणून आता हात मिळवत नाही. मात्र तसं काही नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्यामुळे मी हातात हात देणं टाळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच कोरोना आजाराबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी असं आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केले.
दरम्यान, राज्य सरकार आणि महापालिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून आपल्याला फक्त पुढचे 10 ते 15 दिवसच काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार होलिकोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १ लाखांवर पोहोचली आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. कोरोना आता ९४ देशांमध्ये पसरला आहे, तर १,०२,१८० लोकांना संसर्ग झाला आहे. यातील ८०,६५१ रुग्ण चीनमधील आहेत. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, या रोगाचे नवे ९९ रुग्ण आढळून आले आहेत, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण विषाणूंचे केंद्र हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी वुहानच्या बाहेरचे आहेत.