लोणावळा : महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कुलस्वामिनी श्री एकविरा देवीची आज मंगळवारी (दि .३१) चैत्र सप्तमीला होणारी यात्रा प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आली असून पहाटे व सायंकाळी केवळ रिती रिवाजाप्रमाणे धार्मिक विधी केले जाणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तथा वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधिश स.अ.मुळीक व सचिव तथा तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली. महाराष्ट्रातील तमाम कोळी आग्री समाजाची कुलस्वामिनी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या श्री एकविरा देवीच्या यात्रा दरवर्षी कार्ला गडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असते. षष्टीच्या दिवशी देवघर या माहेरघरात देवीचा भाऊ काळभैरवनाथाचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा, सप्तमीला कार्ला गडावर सायंकाळी सात वाजता वाद्यांच्या गजरात देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा व अष्टमीच्या पहाटे देवीचे तेलवन व मानाचा सोहळा पार पडतो. देवीचे हे तीन दिवस चालणारे सोहळे याची देही याचि डोळा पाहण्याकरिता महाराष्ट्र भरातून किमान पाच ते सहा लाख भाविद दरवर्षी गडावर येत असतात.
सायंकाळी सात वाजता कापूर जाळून होणार आरती
श्री एकविरा देवीची यात्रा व पालखी मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आला असल्याने महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्तांनी सायंकाळी सात वाजता आपआपल्या घराच्या खिडकी मध्ये कापूर पेटवत देवीची आरती करत सोहळा साजरा करावा असे आवाहन श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. राज्यावरील कोरोना संकटात सर्वांनी प्रशासनाला साथ देत सामाजिक बांधिलकी जपायची आहे. कापूरामध्ये जंतूनाशक शक्ती असल्याने तो घरात पेटविल्यास घरातील रोगराई निघून जाईल तसेच कापूराच्या उजेडाने सर्व परिसरात रोषणाई होईल व देवीची यात्रा साजरी केल्याचा आनंद मिळेल, याकरिता कोणीही घराबाहेर न पडता घरातूनच कापूर पेटवावा असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोळी, आग्री, सीकेपी, सोनार समाज मोठ्या श्रध्देने गडावर विविध गावांमधून पालख्या घेऊन गडावर येतात.