मुंबई - जगभरासह महाराष्ट्रामध्येही गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या फैलावामुळे गंभीर संकट उभे राहिलेले आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. मात्र या काळात राज्यात कोरोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठ मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
या मदतीसाठी एक स्वतंत्प पोर्टल तयार करण्यात येणार आहे. तसेच या पोर्टलवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदतनिधी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा केली जाईल. भारतातील राज्यांचा विचार केल्यास कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच सापडले आहेत. मात्र आता कोरोनाचा वेग मंदावला असून, राज्य सरकारने कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध जवळपास हटवले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेला हिरवा झेंडा दाखवला होता. आता महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ६६ लाख ११ हजार ०७८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांचा विचार केल्यास एकूण १६ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत.