- अशोक पाटील
इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी इस्लामपुरात वारंवार बैठका घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले होते, परंतु प्रशासनाच्या ढिलाईमुळे वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या (Corona Virus patient) वाढतच चालली आहे. शासकीय कोविड केंद्रे भरली आहेत, तर खासगी रुग्णालये मनमानी करीत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये उपचाराबाबत भय निर्माण झाले आहे. (NCP state president Jayant Patil's Islampur in trouble; corona patient increased on daily basis.)
वाळवा तालुक्यात रोज सरासरी अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यांच्यावर उपचारासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पुरेशी शासकीय यंत्रणा नाही. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथे भरमसाट बिल आकारले जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये उपचाराबाबत भय निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. परिणामी रुग्णाच्या घरात आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य खात्याकडून मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲटिजन चाचण्या केल्या जात आहेत, परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जात नाहीत. बहुतांशी रुग्ण खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे.
सध्या लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्नकार्यात गर्दी होत आहे. लॉकडाऊन असले तरी बाजारपेठेतून सर्व साहित्य उपलब्ध होत असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. यावर नगरपालिका, पोलीस आणि शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी फक्त आढावा बैठक घ्यायची, त्यानंतर कारवाईला वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, असा प्रकार सुरू आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील कोरोनाचा कहर कमी होत नसल्याचे दिसत आहे.
प्रशासकीय यंत्रणेत ढिलाईजयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद या जबाबदाऱ्या असल्याने स्वत:च्या मतदारसंघासाठी त्यांच्याकडे कमी वेळ आहे. ते येथे येऊन गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारात ढिलाई येत आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे.