प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या आणि महाराष्ट्रात पुणे दुस-या क्रमांकावर आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. लॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यात थोडेफार यश आले असले तरी पुढील काळ आव्हानात्मक असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे ट्रेसिंग आणि सोशल डिस्टन्सिंग हाच सध्याचा प्रभावी पर्याय मानला जात आहे. महाराष्ट्रातही 'केरळ मॉडेल' राबवण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.
महाराष्ट्रात २२ एप्रिल पर्यंत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ९०,२२३ नमुन्यांपैकी ८३,९७९ जणांचे नमुने निगेटिव्ह तर ५६४९ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात आतापर्यंत ८३१५ जणांची चाचणी झाली असून, ७१३१ जण निगेटिव्ह निघाले आहेत. रुग्णांची वाढती संख्या ठरावीक परिसरापुरतीच मर्यादित असल्याने सामूहिक संसगार्पासून अद्याप दूर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, लॉकडाऊननंतर रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हे खरे आव्हान असणार आहे.
भारतातील पहिले तीन रुग्ण केरळमध्ये आढळून आले. त्यानंतर देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत गेला. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५०० च्या अलिकडेच रोखण्यात केरळ प्रशासनाला यश आले आहे. सुरुवातीपासून जास्तीत जास्त चाचण्यांवर दिलेला भर, रुग्ण आणि नातेवाईकांचे समुपदेशन, विलगीकरणासाठी नियोजनबद्ध वैद्यकीय देखरेख, आरोग्य सेवकांकडून राज्यभरात करण्यात आलेली जनजागृती आणि प्रशासनाच्या प्रत्येक सुचनेचे नागरिकानी केलेले काटेकोर पालन यामुळे केरळला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महाराष्ट्रात सर्वसमावेशक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांकडून नोंदवले जात आहे.
-----------राज्याच्या ठराविक भागांमध्येच रुग्ण वाढण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहोचायचे असेल तर ट्रेसिंग वाढवावे लागणार आहे. दक्षिण कोरियाप्रमाणे चाचण्यांची लक्षणीय संख्या आपल्याला परवडणारी नाही. मात्र, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी व्हायला हवी. नागरिकांनी स्वत:मध्ये काही लक्षणे आढळल्यास समाजाच्या भीतीने घरातच थांबुन राहता कामा नये. लॉकडाऊनचस उपयोग होत नाही, असे म्हणता येणार नाही. लॉकडाऊन असताना १००० रुग्ण आढळत असतील तर, लॉकडाऊनशिवाय हे प्रमाण १० हजारांच्या घरात गेले असते. लॉकडाऊननंतर रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवायची असेल तर वैयक्तिक स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग हेच पर्याय असतील. ८० टक्के रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे दिसत नसून, ते आपोआप बरे होत आहेत. मात्र, त्यांच्याकडून इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरणावर भर द्यावा लागेल.- डॉ. अनंत फडके, सहसमनव्यक, जनआरोग्य अभियान
------पुण्यात सामूहिक संसगार्ला सुरुवात झालेली नाही. कारण, ठराविक भागांमधील एकाच कुटुंबातील झ संपकार्तील ठळक बाधित आढळून येत आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. सुरुवातीला एका दिवशी १०० चाचण्या होत असतील तर आता ते प्रमाण ३००-४०० पर्यंत वाढले आहे. लॉकडाऊननंतर रूग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे हे मोठे आव्हान असेल.- डॉ. संजीव वावरे