आविष्कार देसाईअलिबाग : जगभरातील तब्बल ८८ देशांमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने तेथील सरकार आणि प्रशासनाची अक्षरश: झोप उडाली आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांकडून सॅनिटायझर, मास्कचा वापर वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून सॅनिटायझर आणि मास्कला प्रचंड मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील बहुतांश मेडिकल स्टोअरमध्ये त्यांचा तुटवडा जाणवत आहे.
मेडिकल स्टोअरमधून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मास्कची विक्री करू नये तसेच औषधांचा साठा करणारे तसेच चढ्या दराने विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांमध्ये मास्क आणि सॅनिटायझरच्या विक्रीमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. मेडिकल स्टोअरमध्ये साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही दुकानदार आणि पुरवठादार यांच्याकडून जाणूनबुजून मास्क आणि सॅनिटायझरचा साठा करण्यात येत असल्याचेही बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सध्या कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लागण झालेली नाही. परंतु रायगड जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी परदेशी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी मोठ्या संख्येने औद्योगिकीकरण झालेले आहे. येथील कंपन्यांमध्ये परदेशातील नागरिकांची ये-जा असल्याने कोरोनाबाबत दक्ष राहणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वाेतोपरी उपाययोजना आखल्या जात आहेत. सॅनिटायझर, मास्कचा साठा उपलब्ध नसून मुंबईमधून माल उपलब्ध झाल्यावर त्याची नियमानुसार विक्री करण्यात येईल, असे मेडिकल स्टोअरच्या मालकांकडून सांगण्यात येत आहे.काही ठिकाणी नागरिकांना चढ्या दराने मास्क, सॅनिटायझर विकत घ्यावे लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.मालवाहू जहाजांवर प्रतिबंधजिल्ह्यात परदेशातून सागरी मार्गे येणाºया मोठमोठ्या जहाजांकरिता छोट्या बोटींद्वारे स्थानिक मच्छीमारांमार्फत सामान पुरविले जाते. त्यावर तत्काळ प्रतिबंध लागू करावेत. परदेशी नागरिक आणि स्थानिक नागरिक प्रतिबंधात्मक उपाय न वापरता एकमेकांच्या थेट संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यासंदर्भात साहाय्यक आयुक्त, मत्सव्यवसाय यांनी त्यांच्या स्तरावरून जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सोसायट्यांना निर्देश द्यावेत. मत्सव्यवसाय आयुक्त, जे.एन.पी.टी. प्रशासन आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड या विभागांनी याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती घ्यावीरायगडचे पोलीस अधीक्षक आणि पनवेल-नवी मुंबई पोलीस उपायुक्त, परिमंडळ - २ यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग बोर्डिंग, फार्महाउसेस आदी ठिकाणी वास्तव्यास असणाºया परदेशी नागरिकांची माहिती दररोज फॉर्म-सीमध्ये संबंधित पोलीस ठाण्यामध्ये सादर करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात, परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करावे तसेच याबाबतचा अहवाल दररोज त्यांच्याकडे सादर करावा.जिल्ह्यातील जेट्टींवर प्रशासनाची नजररायगड जिल्ह्यात असलेल्या जे.एन.पी.टी. पोर्ट, उरण, धरमतर जेट्टी, अलिबाग व दिघी पोर्ट, श्रीवर्धन, सानेगाव जेट्टी (रोहा) यासह अन्य ठिकाणी मोठमोठ्या जहाजातून होणाºया मालवाहतुकीद्वारे तसेच मांडवा जेट्टी यासारख्या ठिकाणी होणाºया प्रवासी वाहतुकीद्वारे परदेशातून आलेले नागरिक जिल्ह्यात तपासणीशिवाय (स्क्रीनिंग) प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सागरी मार्गाने बाहेरच्या देशातून येणारे नागरिक यांची कोरोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे आवश्यक ती तपासणी (स्क्रीनिंग) झाल्याशिवाय ते जिल्ह्यात प्रवेश करणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी तसेच कोरोना विषाणू संदर्भातील कार्यालयास अवगत करावे, असे आदेश जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिले आहेत.