पुणे : पारदर्शकता व प्रामाणिकता हाच महाविकास आघाडीचा धर्म मानून आम्ही काम करीत आहोत.त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपविण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या दिवशी यामध्ये जास्त संख्या दिसते, त्यास कारण संबंधित रूग्णांच्या चाचणीचा अहवाल उशिरा आल्याने ती वाढ होत असते. परंतु, अशी वाढही आम्ही लागलीच सांगत असतो. त्यामुळे मृत्यूदर लपविला जातो, चाचण्याचे प्रमाण कमी आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, देशात सर्वात जास्त कोरोनाच्या चाचण्या मुंबईत झाल्या असून त्यापाठोपाठ पुण्यात झाल्या आहेत.त्यामुळे पुणे शहरात चाचण्याचे प्रमाण कमी आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आरोग्य विभागाकडून १०० टक्के केले जात आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांची चाचणी करणे, तसेच कोरोनाबाधिताच्या सर्वाधिक संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यास आमचे प्राधान्य आहे. या संदर्भात पुण्यामुंबईसह सर्वत्र चांगले काम चालू आहे, त्यामुळेच कोरोनाबाधितांचा आकडा जास्त दिसत आहे. दुसरीकडे ज्या अनेक राज्यात चाचण्या होत नाहीत, तेथे ती संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे. परंतु हे चित्र भविष्याच्यादृष्टीने योग्य नसल्याचेही ते म्हणाले. नागरिकांपासून कोरोना संदर्भातील कोणतीही गोष्ट लपवायची नाही, असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मत आहे. यामध्ये राजकारण होण्याचे कारण नसून, आम्ही सर्व बाबी स्पष्टपणे सांगत आहोत. या उपरही काही बाबी लपविले जात असल्याचे कोणाला वाटले तर त्यांनी त्या सांगाव्यात त्याबाबत खुलासा करण्यासाठी राज्य शासन तयार आहे. दरम्यान जर कोणी जाणीवपुर्वक चुकीचे काम करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
---------------------