राजानंद मोरे - पुणे : एखाद्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसली तरी तो कोरोना विषाणूने बाधित असू शकतो. या व्यक्तीसह अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षात न येण्यासारखी लक्षणे असलेल्या व्यक्तीमुळे इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा कोरोना विषाणूच्या वाहकांना म्हणजे 'सायलेंट कॅरिअर' ना रोखण्याचे आव्हान आता आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे. पुण्यात बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांमध्ये लक्षणे दिसत नसली तरी, त्यातील ४० ते ५० टक्के जणांना कोविड-१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तींना रोखण्यासाठी कर्फ्यू सारख्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तसेच एकीकडे लॉकडाऊनला १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्यने वाढ होत असली तरी ही वाढ तुलनेने नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. चीनमधील एका अभ्यासानुसार, फेबु्रवारी अखेरपर्यंत कोरोनाबाधित लोकांपैकी तब्बल ४३ हजार जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. पण यातील कोणतेही लक्षण नसताना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातही असे अनेक रुग्ण समोर आले आहेत. एखाद्यामध्ये लक्षणे आढळून आल्यानंतर त्याची चाचणी घेतली जाते. त्यात लागण झाल्याचे दिसल्यानंतर कुटुंबीयांची तपासणी होते. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून येणाºयांचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतेही लक्षणे आढळून येत नाही. तर काहींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाची लक्षणे असतात. त्यांना 'सायलेंट कॅरिअर'म्हटले जाते. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (एनआयव्ही) माजी संचालक डॉ. अखिलेश मिश्रा म्हणाले, कोरोना विषाणू हा नवीन असल्याने फारसे संशोधन नाही. या विषाणूमध्ये नक्की कसे बदल होत आहेत, हे माहीत नाही. .............लक्षणे नसलेल्या व्यक्तींकडून विषाणू सहज पसरू शकतो. अशा प्रत्येकाची चाचणी करणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे सध्या आपण कोरोनाला पूर्णपणे थांबवू शकणार नाही. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती एका पातळीपर्यंत येत नाही. तोपर्यंत विषाणूचा संसर्ग किती वाढेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंंग खूप गरजेचे आहे.- डॉ. अखिलेश मिश्रा, माजी संचालक, एनआयव्ही...............प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळेही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या अनेक जवळच्या नातेवाईकांना लागण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. नातेवाईक वगळता इतर रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत पण कोरोनाची लागण झालेली असू शकते, त्यांना रोखण्यासाठी आता कफ्यूर्सारखी उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे.- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.
............लक्षणे नसलेल्या बाधितांकडून संसर्ग होण्याचा धोका खूपच कमीकोरोनाची लक्षणे आढळून येण्याचा कालावधी २ ते १४ दिवसांचा समजला जातो. पण काहींमध्ये तो २१ दिवसांपर्यंत दिसून आला आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींच्या कुटुंबातील किंवा संपकार्तील सर्वांचे विलगीकरण केले जात आहे. त्यांना रोखून धरत संसर्ग कमी करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. लक्षणे नसलेल्या बाधित लोकांकडून संसर्ग होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. जगात हे प्रमाण केवळ एक टक्का आहे. त्याचा फारसा धोका आपल्याकडे दिसत नाही, असा दावा राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे.