पुणे : भारतात कोरोनाबाधित रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांना ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन ’ या प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यास सुरुवात झाली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या गोळ्यांची भारताकडे मागणी केली आहे. त्यामुळे या गोळ्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. पण या गोळ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) निश्चित केलेल्या घटकांसाठीच उपलब्ध आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनानेही या गोळ्यांनी औषध दुकानांमधून विक्री करण्यास बंधने घातली आहेत. विनाकारण किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेतल्यास विपरीत परिणामही होऊ शकतात.भारतात संधीवाताच्या रुग्णांसाठी किंवा मलेरियामध्ये अँटीव्हायरल म्हणून ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन’ या गोळ्यांचा वापर केला जातो.@‘आयसीएमआर’च्या म्हणण्यानुसार, ही गोळी कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठीही परिणामकारक आहे. मात्र, या गोळीचा वापर ठरावीक लोकांनीच करण्याबाबतही नियमावली करण्यात आली आहे. सुरुवातीला या गोळीच्या वापराबाबत सोशल मीडियावर माहिती येऊ लागल्यानंतर लोकांकडून मागणी वाढली. कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता काहींनी या गोळ्यांचा वापर केला. त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे या गोळ्यांच्या खुल्या विक्रीवर बंधने घातली. अन्न व औषध प्रशासनाकडून या गोळ्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही गोळी द्यायची नाही, अशा सक्त सूचना आहेत. त्यामुळे सध्या बहुतेक औषध विक्रेत्यांकडे या गोळ्यांची मागणी तुलनेने कमी झाली आहे.‘आयसीएमआर’ नियमावलीनुसार, कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व्यक्तींना या गोळ्या द्यायला हव्यात. या गोळ्यांचे डोसही निश्चित केले आहेत. अधिकचे डोस झाल्यास संबंधितांना त्रासही होऊ शकतो. तर १५ वर्षांखालील मुलांना या गोळ्या देऊ नयेत, असेही स्पष्ट केले आहे. नायडू व अन्य रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचाºयांना या गोळ्या देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच रुग्णांनाही या गोळ्या दिल्या जात आहेत. ही गोळी केवळ प्रतिबंधात्मक म्हणून वापरण्यास परवानगी दिलेली आहे. ........कोरोनासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन ही गोळी वापरण्यास परवानगी दिल्यानंतर लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. अनेकांनी कोणताही सल्ला न देता गोळ्या खाल्या. त्यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. जास्त गोळ्या खाल्यास लिव्हर व किडनीवर परिणाम होऊ शकतो. जास्त डोस घेतल्यास मलेरियासारख्या आजाराला प्रतिकार करण्याची शक्तीही कमी होईल, अशी भीती आहे. त्यामुळे लोकांनी या गोळीसाठी आग्रह करू नये.- डॉ. अविनाश भोंडवे,अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखा.............हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या गोळ्यांच्या विक्रीवर बंधने घालण्यात आली आहे. एमबीबीएस किंवा त्यावरील डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या दुकानांमध्ये पुरेशी उपलब्धता आहे. रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांना प्राधान्य दिले जात आहे. सध्या कोरोनाबाधित किंवा संपर्कातील लोकांनाच गोळ्या दिल्या जात असल्याने मागील काही दिवसांत या गोळ्यांची मागणीही नाही.- सुशील शहा, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट.........