कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. राज्यात बुधवारी तब्बल 4,024 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. कालच्या तुलनेत हा आकडा तब्बल 36 टक्क्यांनी अधिक असून, या काळात दोन संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईचा विचार करता, येथे तब्बल 5 महिन्यांनंतर, आज (बुधवार) विक्रमी कोरोना रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईत 5 महिन्यांनंतर विक्रमी रुग्ण संख्येची नोंद -मुंबईमध्ये बुधवारी 2,293 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 23 जानेवारीनंतर एक दिवसात समोर आलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. यासंदर्भात स्वतः बीएमसी माहिती दिली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात बी. ए. 5 व्हेरिअंटचे संक्रमण झालेले चार नवे रुग्ण समोर आले आहेत. या संक्रमितांचे वय 19 ते 36 वर्षांच्या आत आहे. सध्या यांची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. बीएसमीकडून बीकेसी जंबो कोविड केअर सेंटरमध्ये मेडिकल स्टाफसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या शिवाय, मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणीही केली जात आहे.