मुंबई - संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र अशातच कोरोना व्हायरसचे देशात ४५ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. या रुग्णांवर नायडू हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा, ऊरुस पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असं प्रशासनाने सांगितले आहे. होळी सण कुटुंबासोबतच साजरा करा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केले आहे.
भारतातकोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. कर्नाटकमधील बंगळुरू येथील एका आयटी इंजिनीअरला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हा कर्नाटकातील पहिला रुग्ण आहे. तर पंजाबमध्येही कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण इटलीहून भारतात परतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
दरम्यान, खामगाव शहरातील एका नागरिकास ‘कोरोना’या आजाराची लागण झाल्याचा संदेश सोशल मीडियावर सोमवारी सकाळी व्हायरल झाला. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली. खात्री करण्यासाठी अनेकांनी संबंधित खासगी रूग्णालयात धाव घेतली. मात्र, ‘कोरोना’चा कोणताही रूग्ण आढळला नसल्याचा तसेच कोणत्याही रूग्णांवर उपचार सुरू नसल्याचा खुलासा संबंधित रुग्णालयाने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना’चा रूग्ण आढळल्याच्या अफवेने खामगावात खळबळ
कोरोनापासून बचावासाठी कपल्सने 'अशी' घ्या काळजी...
अकोल्यातील ‘कोरोना’ संशयिताचा अहवाल ‘निगेटिव्ह’!
भारतात धोका वाढला! आणखी दोन राज्यांत रुग्ण आढळले, संख्या पोहोचली 45 वर
काँग्रेसला कोरोनाचा धसका, 'दांडी यात्रा' पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय