मुंबई - संपूर्ण देशात आता कोरोनाची भीती वाढली आहे. देशात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील एक जण मुंबईतील आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात संशयितांच्या हातावर निळ्या रंगाचे शिक्के मारायला सुरुवात झाली आहे.
नागपूर पाठोपाठ आता मुंबई एअरपोर्टवरही संशयितांच्या हातावर शिक्के मारायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची कुणी व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर आढळ्याल्यास तिला घरी जाण्यास सांगणे आवश्यक आहे.
मुंबई, नागपूर विमानतळावर शिक्के मारायला सुरुवात -
मुंबई आणि नागपूर विमानतळावर स्क्रीनिंगदरम्यान संशयित व्यक्ती आढळल्यास तिच्या हाताच्या मागील बाजूला शिक्का मारण्यात येणार आहे. यामुळे संबंधित व्यक्ती ओळखता येणे सोपे होणार आहे. केंद्र सरकारने इटली, चीन, ईराण यासह सात देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्य सरकारने आणखी तीन देशांचा समावेश केला आहे. यात सऊ दी अरब, दुबई व अमेरिकेचा समावेश आहे. या शहरांतून येणाऱ्यात संशयित पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महाराष्ट्र सरकारने सोमवारी घेतला होता निर्णय -
महाराष्ट्र सरकारने सोमवारी यासंदर्भात निर्णय घेतला होता. घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.
राजेश टोपे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन, कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या देशांमधून आलेल्या लोकांना A, B, C अशा कॅटॅगरीमध्ये ठेवले जाणार आहे. A म्हणजे ज्यांच्यात लक्षण आहेत, त्यांना वेगळे ठेवले जाणार आहे. B मध्ये वयोवृद्ध आहेत, ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शनचा त्रास आहे. त्यांनाही 14 दिवस क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. 14 दिवस लक्षणे आढळली नाहीत तर ट्रीटमेंट होणार नाही. तर C मध्ये परदेशातून आले, मात्र ज्यांना लक्षण नाही अशांना घरातच क्वॉरेंटाईन करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले होते. तसेच, घरी क्वॉरेंटाईन केलेल्या लोकांच्या हातावर निवडणुकीच्या शाईप्रमाणे शिक्का मारण्यात येईल. जेणकरून घरी क्वॉरेंटाईन केलेले लोकं जर बाहेर दिसले, तर बाहेरील लोकांना समजेल की, अशा व्यक्तींना घरी क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे, असेही टोपे यांनी सांगितले होते.
मुंबईत महाराष्ट्रातील पहिला बळी -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हिंदुजामधील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे.