मुंबई : राज्यात शनिवारी १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के एवढे झाले आहे. तीन महिन्यात सर्वात कमी नोंद आहे. सध्या १ लाख ८८ हजार २७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ९९ हजार ५१२ आहे. तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यात शनिवारी एकही दैनंदिन मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे दिसून आले. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर, ८९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
मुंबईत वाढले ८६६ रुग्णमुंबई : दिवसभरात ८६६ रुग्ण वाढले असून २९ मृत्यू झाले आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५११ दिवसांवर पोहोचला आहे. २९ मे ते ४ जूनपर्यंत मुंबईतील एकूण रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के आहे.मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील २४ तासांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १ हजार ४५ आहे, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७७ हजार ६४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात सध्या १६ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत.मुंबईत ७ लाख १० हजार ८०७ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या १५ हजार १८ आहे. दिवसभरात २६ हजार ६६९ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ६३ लाख ९८ हजार ६६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात २७ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ११६ आहे.
राज्यातील २ कोटी ३७ लाख लाभार्थ्यांना लसमुंबई : राज्यात शुक्रवारी ३ लाख ७२ हजार ५२८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ३७ लाख ७ हजार ७५८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.राज्यात १२ लाख ४ हजार ७५४ आराेग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख ४३ हजार ५९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात १८ लाख ५१ हजार ७४० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ८६ हजार ४९९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १५ लाख ७ हजार ६०५ लाभार्थ्यांना पहिला, तर १२,१०० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४४ लाख १० हजार २२२ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ३१ लाख ९१ हजार २४२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत ३६ लाख ३५ हजार ३५५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात ३० लाख ५० हजार ३१९, नागपूरमध्ये १३ लाख १२ हजार १८४, ठाण्यात १७ लाख ७४ हजार ६९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.