Corona Virus Maharashtra Updates: राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. पुण्यात आता निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नाशिककरांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
"नाशिकमध्ये सातत्यानं रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे सर्व सामान्यांचे खूप हाल होतात. पण नागरिक निर्बंधाचे पालन करत नसल्याने लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ शकते", असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. असे ही ते म्हणाले. छगन भुजबळ यांनी आज नाशिकमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने नाशिकमध्ये लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र छगन भुजबळ यांनी नाशिककरांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. "आठ दिवसानंतर मंत्रिमंडळात वस्तुस्थिती मांडणार आहे आणि २ एप्रिल रोजी परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
दुकानदार आणि ग्राहकांमध्येही बेफिकीरपणा अधिक जाणवत असून विना मास्क दुकानात आल्यास दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.