पुणे: जगण्याच्या लढाईत तिन्ही त्रिकाळ वेगवेगळ्या समस्यांना निधड्या छातीने तोंड देणाऱ्या भारतीयांना आजार काही नवे नाहीत. त्यांचा हा निर्धार गुणसुत्रांमधलाच असला तर कोरोना विषाणूंवरही ते यशस्वी मात करतील अशी चर्चा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांमध्ये कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. त्याचाच वेध काही तज्ञ डॉक्टरांबरोबर बोलून घेतला असता त्यांनी यावर अधिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक व्यक्तीची गुणसूत्रे वेगवेगळी असतात, मात्र त्यातही प्रदेश, वातावरण, वंश अशा काही गोष्टींचा कणमात्र का होईना एक भाग असतोच, भारतीयांमधील हा भाग या लढाईत कदाचित ऊपयोगी पडू शकतो असा एक अंदाज यातून व्यक्त होताना दिसतो आहे.पँथॉलाजिस्ट(एम.डी.) डॉ. मंदार परांजपे यासंबधी बोलताना म्हणाले,"जगात सर्वत्र या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही तो पोहचलाच आहे. मानवी शरीरात रक्तामध्ये लाल व पांढर्या पेशी असतात. त्यातील पांढर्या पेशी बाहेरून शरीरात आलेल्या विषाणूंबरोबर लढण्याचे काम करतात. पांढऱ्या पेशी लढत असताना कधीकधी त्यातून घातक असे सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होते. त्यात 'आयएल6' हे एक प्रकारचे रसायन निर्माण होते. सायटोकाईन स्टॉर्म हे रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकते. सायकोकाईन स्टॉर्म निर्माण होण्याची संभाव्यता ही पांढऱ्या पेशीवर असलेल्या विशिष्ट ह्यूमन ल्यूकोसाईट अँन्टीजेननुसार ठरते."डॉ. परांजपे पुढे म्हणाले, " भारतीयांच्या पांढऱ्या पेशींवर जे विशिष्ट ह्यूमन ल्युकोसाईट अँन्टीजेन जास्त प्रमाणात आहेत, त्यांच्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मची संभाव्यता कमी होत असावी आणि त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा असा एक आशावादी शास्त्रीय अंदाज व्यक्त होतो आहे. पण अजून हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले नसल्यामुळे आपण अजिबात गाफील राहून चालणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी ही आपण घेतलीच पाहिजे."डॉ. अनंत फडके हेही वैद्यक क्षेत्रातील नावाजलेले तज्ञ आहेत. ते म्हणाले" या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे हे बरोबर आहे, मात्र ती प्राथमिक स्तरावर आहे. हा विषाणू नवा आहे, त्याची लक्षणे नवी आहेत. भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती अन्य लोकसमूहांपेक्षा निश्चितच चांगली आहे. पण या नव्या विषाणूच्या आजारासमोर ती कसा व.किती टिकाव धरेल यावर अभ्यास व अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तसा अभ्यास व संशोधन सुरूही असेल किंवा आहे. त्यातून पुढे काही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झाले तरच यावर खात्रीपूर्वक बोलता येईल.
Corona virus : भारतीयांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाचवेल का कोरोनापासून?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:57 PM
त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा...
ठळक मुद्देवैद्यक व्यावसायिकांत चर्चा: अभ्यास व संशोधनाची व्यक्त होते आहे गरज