लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सध्या पुण्या-मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यात कोरोनाचा १५ आॅगस्टपर्यंत उच्चांक गाठेल. सप्टेंबरमध्ये हळूहळू रुग्ण संख्या कमी होण्यास सुरुवात होईल. यामुळे घाबरुन जाण्याची कोणतही गरज नाही. यंत्रणेने सतर्क राहून उपाययोजना करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी येथे सांगितले.
विधानभवन येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना नियंत्रणासाठी बैठक झाली. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह पुण्यातील अधिकारी उपस्थित होते.
आम्ही होर्डिगवर चांगलो दिसत असलो तरी कामाचा डोलारा अधिकाऱ्यावर आहे. उरी पिक्चरसारखे तुम्ही सर्व माझे सैनिक असून, आता युद्धासारखी परिस्थिती असल्याने झोकून देऊन काम करा, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यात आठ दिवसांच्या आत जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे. कोरोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे, अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी.
अजित पवार म्हणाले, राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिलेली नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा. आदित्य ठाकरे म्हणाले, पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहेत. पावसाळ्यात होणाºया सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.खासगी हॉस्पिटलचे बिल...मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसारखे पुण्यातही खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणारे बिल प्रथम प्रशासनाने नियुक्त केलेल्या आॅडिटरने तपासावे. नियमानुसार असल्याचे आॅडिटरने सांगितल्यानंतरच रुग्णांनी बिलाचे पैसे द्यावेत. अशी यंत्रणा राबविल्यास तक्रारी येण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद होईल. खासगी हॉस्पिटलकडून होणारी नागरिकांची लूटही थांबेल.