मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असताना, खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन आणखी कठोर केला जाईल आणि मुंबईत लष्कराला पाचारण केलं जाईल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात आहे. मात्र, या सगळ्या चर्चा म्हणजे निव्वळ अफवा असून मुंबईत लष्कराची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला.
कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपण सगळेच सैनिक आहोत. आजवर जे काही केलं ते तुम्हाला विश्वासात घेऊन केलं. त्यानंतर, संयमाच्या, जिद्दीच्या जोरावर ही लढाई आपण लढताय. फक्त गैरसमज आणि गडबड-गोंधळ होता कामा नये. संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर वगैरे बोलावणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी राज्यवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केलं.
कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनचं काटेकोर पालन व्हावं यासाठी पोलीस दिवसरात्र झटत आहेत. त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. काही पोलीस आजारीही पडत आहेत. अशावेळी त्यांना विश्रांती देणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदीच गरज भासल्यास केंद्राकडे अधिकचं मनुष्यबळ मागावं लागू शकतं. पण, याचा अर्थ लष्कराला बोलावणार असा होत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांच्या आसपास आहे. हा आकडा खूप मोठा आहे. त्यापैकी 3250 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.