मुंबई : दिल्ली येथील धार्मिक संमेलनामध्ये राज्यभरातील १०६२ लोक सहभागी झाले होते. यापैकी १२७ जण मुंबईतील असून अद्याप ८९० जणांचाच शोध लागला आहे. तर यापैकी ४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा ४२३वर पोहोचला असून २० जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देश-विदेशातून जवळपास ९००० वर लोक आले होते. यापेकी बऱ्याचजणांना कोरोनाची बाधा झाली असून एकट्या दिल्लीत १२९ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात पॉझिटिव्ह सापडलेल्यांपैकी दोघे पिंपरी चिंचवड आणि दोघे अहमदनगरचे आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही दिल्लीला गेलेल्या १२७ जणांचा आकडा समोर येत असून यापैकी १०५ जण सापडले आहेत. तर अन्य नागरिकांचा शोध सुरु असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील २० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करत त्यांची कोरोना तपासणीसाठी स्वाब नमुने घेण्यात आले होते. मात्र येथील सर्वांची स्वाब नमुने कोरोना निगेटीव्ह आल्याची माहीती मिळत आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
शनिवारच्या दरम्यान नायर रुग्णालयात एका रुग्णाला दाखल करण्यात आले. सोमवारी हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. हे समजल्यावर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिकांकडे चौकशी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. यात एक परिसेविका व १० परिचारिका अशा ११ जणी होत्या. तर इतर कर्मचारी मिळून एकूण २० जण असल्याचे समजले. या सर्वांना त्वरीत क्वारंटाईन करण्यात आले. याच दरम्यान त्या सर्वांचे स्वाब नमुने घेण्यात आले. गुरुवारी हे नमुने कोरोना मुक्त असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान केईएम रुग्णालयातही एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या दोन परिचारिकांना क्वारंटाईन करावे लागले होते. तर विक्रोळी येथील परिचारिकेलाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रसाराची चिघळणारी स्थिती पाहता आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी मास्क, पीपीई किट्स मिळावेत यासाठी कर्मचारी संघटनाही पुढे सरसावत आहेत.