- अतुल कुलकर्णीमुंबई : कोरोनाची लागण सुरु झाली तेव्हा बाधितांच्या ‘स्वॅब’ची तपासणी राज्यात तीन लॅबमध्ये होत होती. ती संख्या आता ७ वर गेली आहे. आणखी ८ सरकारी आणि ५ खाजगी अशा १३ लॅब टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. लॅबचे रिपोर्ट जसे येऊ लागतील तसे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही वाढत जाईल, अशी माहिती आहे.कोरोनाची साथ सुरु होण्याच्या दरम्यान मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये रोज ५० रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासण्या होत होत्या. त्या आता २०० पर्यंत गेल्या आहेत. इंदिरा गांधी हॉस्पिटल नागपूर येथे ४० वरुन १०० आणि एनआयव्ही पुणे येथे १०० तपासण्या होत आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्लीत इंडियन काऊन्सील मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे राज्यात आता चार नवीन सरकारी लॅब सुरु झाल्या आहेत. ज्यात मुंबईत केईएम (२००), जेजे हॉस्पीटल (१००), हाफकीन इन्स्टीट्यूट (१००) आणि पुण्याच्या बी .जे. मेडीकल कॉलेज (१००) येथे मिळून रोज ५०० सॅम्पल तपासण्याचे काम सुरु झाल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.लहाने म्हणाले, २७ तारखेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथील लॅब सुरु होईल. तसेच नागपूर, अकोला, धुळे, सोलापूर, मीरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लॅब ३१ एप्रिल रोजी तर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लॅब ७ एप्रिल रोजी कार्यान्वित होईल. या सात ठिकाणी प्रत्येकी १०० असे एकूण ७०० सॅम्पल रोज तपासले जातील.केंद्र सरकारने मुंबईत पाच खाजगी लॅबना परवानगी दिली आहे. थायरोकेअर (४००), सबरबन डायग्नोस्टीक (२००), मेट्रोपॉलिश हेल्थ केअर (३५०), एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर (४००) आणि एसआरएल लॅब (४००) सॅम्पल असे एकूण १७५० सॅम्पल तपासले जातील. या लॅबही एक-दोन दिवसात पूर्ण क्षमतेने सुरु होतील. कोरोनाचा आजार ‘अधिसूचित आजार’ म्हणून नोंदवलेला आहे, त्यामुळे या खाजगी लॅबना तपासल्या जाणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. या तपासण्या त्यांनी शक्यतो मोफत कराव्यात. व शक्य नसेल तर स्क्रीनींगचे १५०० रुपये आणि कर्न्फमेटरीचे ३००० असे ४५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे त्यांना घेता येणार नाहीत, असेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.हाफकिनमध्ये २ लॅब- जेव्हा कोरोनाची लागण सुरु झाली त्याचवेळी हाफकिनचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी येथे लॅब सुरु करता येईल का याची चाचपणी केली. अवघ्या आठ दिवसात येथे काम करणारे सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञांनी युध्दपातळीवर काम करुन दोन लॅब सुरु केल्या. डॉ. राजेश देशमुख म्हणाले,- आमच्याकडे एक लॅब सोमवारी सुरु झाली. बर्ड फ्ल्यूच्यावेळी तयार केलेली एक लॅब पडून होती. ती मंगळवारपासून पूर्णक्षमतेने कार्यान्वित होईल. या दोन्ही लॅबमध्ये मिळून आम्ही २०० सॅम्पल तपासू. आम्हाला सॅम्पल कस्तुरबा हॉस्पिटलमधून मिळतील, तीन शिफ्टमध्ये या दोन्ही लॅब चालवण्याचा प्रयत्न आमचे शास्त्रज्ञ करत आहेत.
Coronavirus : कोरोना स्वॅब तपासणीसाठी राज्यात आणखी १३ लॅब
By अतुल कुलकर्णी | Published: March 25, 2020 2:29 AM