उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना काहीठिकाणी अद्यापही कोरोनाचं गांभीर्य राखलं जात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात अशाच प्रकारची घटना समोर येत आहे. राळेसांगवी येथे प्रशासनाचे नियम धुडकावून लावत जवळपास २०० वऱ्हाडींच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला. दरम्यान, यातील वधूपिताच कोरोना बाधित आढळून आल्यानंतर उपस्थित पाहुण्यांमध्ये कोरोनाची धास्ती वाढली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भूम पोलिसांनी याप्रकरणी २०० जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती. दरम्यान, त्यानंतर वधूपित्यालाच कोरोनाची लागण झाल्याचं ३ जुलै रोजी निष्पन्न झाले. तेथून सुरु झालेली बाधितांची साखळी अजूनही तुटलेली नाही. या गावातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत बाधितांची संख्या १७ वर पोहोचली आहे. अनेकांचे अहवाल अजून यायचे आहेत पण या आजारातून बरे झाल्यानंतर वधूपित्याने कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरू नये, तसेच त्यास गांभीर्यानेही घेऊ नये, असा संदेश देणारा एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल केला. ही माहिती समजताच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशाचे उल्लंघन करुन विवाह सोहळा घडवून आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
याअनुषंगाने मंगळवारी सकाळी भूमचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी कार्यवाही करीत ग्रामसेवकाची तक्रार घेऊन विवाह सोहळ्याचे आयोजक व व्हिडिओ चित्रीकरणात दिसणाऱ्या सुमारे २०० व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.
बाधिताने खाऊ घातली अनेकांना साखर
कोरोना बाधित वधूपित्याने विवाह सोहळ्यास उपस्थित न राहू शकलेल्या अनेक आप्तस्वकियांना साखर खाऊ घातल्याचेही समोर आले आहे़ त्यामुळे संसर्ग प्रसाराचा धोका आणखी बळावल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली़ केवळ वऱ्हाडीच नाही तर यात सहभागी असलेले भटजी, बँड पथक, घोडेवाले, मंडप व्यवसायिक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही खनाळ यांनी सांगितले.